

मुंबई : काम थांबवण्याची नोटीस देऊनही जर बांधकाम व्यावसायिक बांधकाम सुरू ठेवत असेल, तर त्याच्या महापालिकेच्या विविध मंजुऱ्या रद्द कराव्यात. वायू प्रदूषणाच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणे प्रभाग अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचे सदस्यांनी सांगितले. शहरातील प्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीच्या चौथ्या बैठकीसाठी प्रभाग अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. यावेळी हे निर्देश देण्यात आले.
उच्चाधिकार समितीच्या सदस्यांनी निर्देश दिले की, प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याने आपल्या प्रभागातील प्रदूषण कमी करण्यासाठी नोटीस बजावणे आणि इतर उपाययोजनांसह केलेल्या सर्व कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल तयार करून तो समितीकडे सादर करावा. वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन आढळल्यास, प्रभाग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाऊ शकते.
महापालिकेच्या अंधेरी पश्चिममधील एसआरएच्या एका बांधकाम प्रकल्पावर कठोर कारवाई करत, काम थांबवण्याचे आदेश दिले. वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. येथील जुहू डेपोजवळील एका बांधकामाच्या तपासणीदरम्यान अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या.