Mumbai pollution : मुंबईची हवा वर्षभरात अवघे 55 दिवस शुद्ध
मुंबई : वाहनांच्या वाढत्या संख्येसह ठिकठिकाणी सुरू असलेली इमारतीची बांधकामे, मेट्रो, बुलेट ट्रेन, रस्ते व अन्य कामे यामुळे मुंबई शहरातील वातावरण बिघडत चालले आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये मुंबईतील वातावरण समाधानकारक होते. मात्र वर्षभरातील अवघे 55 दिवस मुंबईकरांना शुद्ध हवा मिळाली.
मुंबईतील वायू प्रदूषणाची पातळी दिल्लीपेक्षा चांगली असली तरी, वातावरण बिघडू लागले आहे. मुंबई महानगरपालिकेने मागील चार वर्षांमध्ये मुंबईत किती दिवस चांगले वातावरण होते व किती दिवस खराब होते, याचा अभ्यास केला. त्यानुसार सहा श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. यात चांगल्या वातावरणासह समाधानकारक, मध्यम, गंभीर, खराब व खूपच खराब आदी श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. या श्रेणींनुसार 2025 मध्ये 55 दिवस चांगले वातावरण म्हणजेच शुद्ध हवा होती, तर 161 दिवस समाधानकारक वातावरण होते, 112 दिवस मध्यम, तर एक दिवस गंभीर वातावरण निर्माण झाले होते. मात्र खराब व खूपच खराब वातावरण एक दिवसही नोंदवण्यात आले नाही.
2025 मध्ये चांगले वातावरण अवघे 55 दिवस होते, तर 2024 मध्ये 82 दिवस होते, तर समाधानकारक वातावरण 134 दिवस होते, 148 दिवस मध्यम वातावरण होते, तर 2 दिवस गंभीर वातावरण होते. 2022 ते 2025 या चार वर्षांत 2022 मध्ये अवघा एक दिवस प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे यावेळी हा दिवस खराब श्रेणीत गणला गेला. मात्र गेल्या चार वर्षांत मुंबईत खराब व अतिखराब वातावरण कधीच नव्हते, असे पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अभ्यासात निदर्शनास आले आहे.
