

नागठाणे : नागठाणे (ता. सातारा) हे बाजारपेठेचे मोठे गाव असून परिसरातील सुमारे 40-50 गावांचा या गावात रोजचा राबता आहे. शिक्षण व व्यवसायामुळे सातारला जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पाटण तालुक्यातीलही अनेक गावांचा या गावाशी रोजचा संपर्क असतो. परंतु सध्या हे संपूर्ण गाव धुळीत हरवून गेले आहे. धुळीचे लोटच्या लोट उडत असून रस्त्यालगतची घरे, वाहने धुळीने माखली आहेत. स्थानिकांना श्वसनाचेही आजार जडले आहेत.
नागठाणे - सासपडे या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. या मार्गावर डंपर वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूच्या दुकानदारांना तसेच परिसरातील घरांमध्ये फार मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शेजारी असलेल्या हॉटेल व दुकानांमध्ये हे धुळीचे लोटच्या लोट उडत आहेत. त्यामुळे या दुकानदारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.
काही दुकानदार ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते रस्त्यावर तीन ते चार वेळा पाणी मारत आहेत. परंतु त्यांचे हे प्रयत्न तोकडे पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहनाबरोबर धुळीचे मोठ - मोठाले लोट उडत आहेत. ही धूळ परिसरातील नागरिक, दुचाकी तसेच इतर वाहनचालक तसेच पादचारी यांच्या नाकात तोंडात जात आहे. या धुळीमुळे श्वासनाचे विविध आजार होऊन लोक आजारी पडू लागले आहेत.
या मार्गावरील अवजड डंपर वाहतूक इतर मार्गाने वळवावी, अशी मागणी होत आहे. ज्या भागांमध्ये लोकवस्ती कमी आहे त्या भागातून ही डंपर वाहतूक वळवावी. जेणेकरून लोकांना धुळीचा त्रास होणार नाही, अशी परिसरातील लोकांची मागणी आहे. रस्त्याचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. या मार्गावर संपूर्ण डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्याची गरज आहे. नागठाणे गावात जागोजागी झालेल्या पाईपलाईनच्या कामामुळे व त्यानंतर डांबरीकरण न झाल्यामुळे गावात सर्वत्र धुळीचे साम्राज्य बघायला मिळत आहे.