

मालाड : मालवणीतील मार्वे रोडवर मंगळवारी दुपारी एका विचित्र अपघातात संतोष दुधेकर (वय 36, रा. मालवणी, राठोडी) या दुचाकीस्वार तरुणाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावर बेकायदा उभी असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसच्या लगेजच्या झाकणामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संतोष दुचाकीवरून (एमएच 47 -1821) मालाडच्या दिशेने येत होता. मालवणीतील मार्वे रोडवर अग्निशमन दलाच्या केंद्रासमोर बेकायदा उभी असलेल्या ‘खासगी ट्रॅव्हल्स’च्या बसचे लगेजचे झाकण क्लीनरने अचानक उघडले. त्याचवेळी मागून येणारी त्याची दुचाकी त्या उघड्या झाकणाला जोरात आदळली.
या धडकेत संतोषची मान कापली गेली. रक्तबंबाळ अवस्थेत तो तेथे पडला. त्याला तत्काळ रिक्षामधून कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. संतोष वांद्रेत खासगी कंपनीत कार्यरत होता.
बेकायदा पार्किंगचा गंभीर प्रश्न
मार्वे रोडवर खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस अग्निशमन दलाच्या समोरच अनधिकृतपणे उभ्या केल्या जातात. त्याच ठिकाणी दुरुस्ती व इतर कामेही केली जातात. अर्धा रस्ता व्यापला जातो. परिणामी वाहतूक कोंडी होते. यापूर्वीही या रस्त्यावर जीवघेणे अपघात घडले असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे सांगत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
संतोष दुधेकर याच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई आहे. त्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. तो एकमेव कमवता असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे संतोषच्या नातेवाइकांनी सांगितले.