

मुंबई : विद्यार्थ्यांमधील बौद्धिक गुणवत्ता, संकल्पनात्मक आकलन आणि तार्किक विचारशक्ती मोजण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी पाचवी- आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा वयोगट व अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पालक आणि शिक्षकांकडून नाराजीचा सूर उमटला असून प्रश्नपत्रिकांच्या काठिण्य पातळीवरून ती वादात सापडली आहे. परीक्षेच्या स्वरूपात, प्रश्नरचनेत आणि काठीण्य पातळीत तातडीने कालसुसंगत बदल करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.
राज्यातील पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा राज्यात रविवारी पार पडली. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी एकूण 6 लाख 57 हजार 170 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 लाख 34 हजार 920 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते. आठवीच्या परीक्षेसाठी 3 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 73 हजार 931 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
यंदाच्या भाषा व गणित विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या वयोगट, मानसिक विकास आणि निर्धारित अभ्यासक्रमाच्या तुलनेत अधिक कठीण असल्याची तक्रार आहे. राज्य परीक्षा परिषद यांच्या निकषांनुसार प्रश्नपत्रिका 30 टक्के सोपी, 40 टक्के मध्यम आणि 30 टक्के कठीण असणे अपेक्षित आहे.
प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका खूपच अवघड वाटल्याचे चित्र आहे. लांबलचक प्रश्न , उपप्रश्नांची अनेक संख्या, दिलेल्या उताऱ्यांचे आकारमान आणि उत्तरासाठी आवश्यक टप्पे हे पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेपेक्षा जास्त असल्याचा आरोप होत आहे.
शिक्षकांच्या मागण्या
प्रश्नपत्रिका तयार करताना विद्यार्थ्यांचा वयोगट, मानसिकता, अभ्यासक्रम आणि शिकण्याची पातळी यांचा शिक्षण मानसशास्त्रीय विचार करावा.
प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी संतुलित ठेवून ती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे न्याय्य मूल्यमापन करणारी असावी.
मूल्यमापन प्रक्रियेत आकलन, विश्लेषण, समस्या सोडवणे यांना प्राधान्य देणाऱ्या प्रश्नप्रकारांचा समावेश करण्यात यावा.
प्रश्नपत्रिका निर्मिती प्रक्रियेत अनुभवी शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक मानसशास्त्र तज्ज्ञांचा सहभाग निश्चित करण्यात यावा.
प्रश्नपत्रिकांबाबत अभिप्राय संकलन व पुनरावलोकनाची पारदर्शक यंत्रणा विकसित करण्यात यावी.
शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आणि गुणवत्तेला चालना देणारी असावी; परंतु प्रश्नपत्रिका त्यांच्या आकलन क्षमतेच्या पलीकडे गेल्यास ती प्रेरणेऐवजी भीती निर्माण करते. काठिण्य पातळीचा समतोल राखत शिक्षण मानसशास्त्राच्या निकषांनुसार प्रश्नरचना करणे ही काळाची गरज आहे.
भाऊसाहेब चासकर, संयोजक, ॲक्टिव्ह टीचर्स फोरम, महाराष्ट्र