

मुंबई: मुंबईकरांना ऑफिसच्या वेळेत लोकल डब्यातील जीवघेणी गर्दी टाळून गारेगार प्रवास करता यावा म्हणून पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून महागड्या वातानुकूलित लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
मात्र गेल्या काही दिवसांपासून या वातानुकूलित लोकल गाड्या वारंवार उशिरा धावत आहेत. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना महाग तिकीट घेऊनही नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गात चर्चगेट ते विरार आणि मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे साठी एसी गाड्या चालवल्या जात आहेत. प्रत्येक स्टेशननुसार साधारण १०० ते १५० रुपयांचे तिकीट आकारले जाते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून ऑफिसच्या वेळेला आणि रात्री घरी परतण्याच्या वेळेला अनेक एसी गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असतात. काही ठिकाणी स्थानकावर गाडी न थांबवता पुढे गेल्याचे प्रकारही घडले आहेत.
सीएसएमटी स्थानकावरून अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याणसाठी धावणाऱ्या गाड्या हमखास १५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याचे दिसून येतेे. त्यामुळे सीएसएमटी, दादर, कुर्ला आणि कल्याण स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते.
लोकलचा त्रास टाळण्यासाठी आम्ही एसी लोकलचे तिकीट काढतो. मात्र अनेक वेळेला एसी लोकल वेळेवर येत नाही. त्यामुळे उशीर तर होतोच, पण पैसेही फुकट जातात, अशी प्रतिक्रिया अंबरनाथ प्रवासी सविता भालेराव यांनी दिली.
आमच्या ऑफिसच्या वेळेला एसी लोकल सुरू केल्या. मात्र त्या उशिराने येतात आणि ऑफिसला उशीर होतो. त्यापेक्षा आमच्या जुन्या लोकल वेळेवर धावत होत्या. या नवीन एसी लोकल ऑफिसच्या वेळेत हव्या कशाला, असा सवाल बदलापूरचे प्रवासी अमर लिंगायत यांनी केला.
दोन आठवड्यांत १२५ वेळा गाड्या रद्द
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या १ जुलै ते १६ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस आणि रेल्वेच्या काही तांत्रिक कामांमुळे वातानुकूलित लोकल गाड्या रद्द करण्याची वेळ आली होती. यामध्ये १ जुलै (२), २ जुलै (३), ६ जुलै (२३), ७ जुलै (५०), ८ जुलै (४२ ) अशा १२५ वेळा गाड्या रद्द केल्या आहेत.