

मुंबई: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासह थेट द्वितीय वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने नोंदणी आणि हिवाळी-२०२६ परीक्षेच्या अर्जाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
एआयसीटीई मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया संस्थास्तरावर करण्यात येणार असून, नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यासाठी २२ आणि २३ ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे.
त्यानंतर ४ सप्टेंबरला २०० रुपये दंडासह, तर ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान अतिविलंब दंडासह परीक्षा अर्ज भरता येणार आहे. राज्यातील पदविका (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रियेने यंदा नवा टप्पा गाठला आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत गेल्या वर्षीच्या १ लाख ७ हजार प्रवेशांचा विक्रम सहज मोडला आहे.
गुणपत्रिकेची पडताळणी
विद्यार्थ्यांची नोंदणी करताना फोटो आणि स्वाक्षरीची अचूक प्रतिमा अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातील विषयांमध्ये सूट हवी असल्यास संस्थेने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेची पडताळणी करून ऑनलाइन एक्सेम्प्शन विषयाची माहिती भरावी, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
पात्र विद्यार्थ्यांच्याच नोंदणीचे निर्देश
थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ‘ॲडमिशन लेव्हल एलिजिबिलिटी’ची माहिती संबंधित विभागीय कार्यालयाकडून निश्चित करून घेतल्यानंतरच त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेश निश्चित झालेल्या पात्र विद्यार्थ्यांचीच नोंदणी करण्याचे निर्देश मंडळाने दिले आहेत. नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या संबंधित संस्था आणि अभ्यासक्रमाच्या मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेण्यास संस्थांना सांगण्यात आले आहे.