

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आणि उद्या होणाऱ्या पहिल्या टेकऑफनंतर भूखंड आणि घरांच्या किंमतीत ही 25 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची चर्चा आहे.
पामबीच मार्गावर मोक्याच्या भूखंडाचा दर सात लाख चौरस मीटर तर खारघरमधील एवढा आहे. एका भूखंडाचा मूळ दर थेट 3 लाख 51 हजार रुपये प्रतिचौरस मीटर इतका निविदेमध्ये नमूद केला आहे. 41 हजार 994 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडाचा गुंठ्याचा दर साडेतीन कोटी असून त्याची मूळ किंमत दीड हजार कोटी निश्चित करण्यात आली आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर खारघरचे दर गगनाला भिडले असून, घरांच्या किमतीत 25 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. पामबीच मार्गावर भूखंडाचा दर सात चौरस मीटर एवढा आहे. त्यामुळे या भूखंडाच्या निविदा निघाल्यानंतर लिलाव प्रक्रियेत भूखंडाची किंमत तीन हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर सिडको प्रथमच आता 30 भूखंडांची विक्री करणार आहे. यामध्ये खारघर, नेरुळ, घणसोली, ऐरोली आणि द्रोणागिरी परिसरातील भूखंडांचा समावेश आहे. खारघरमधील एका भूखंडाचा मूळ दर 3 लाख 51 हजार तर दुसऱ्या भूखंडाचा दर 3 लाख 5 हजार रुपये चौरस मीटर इतका ठेवण्यात आला असून नेरुळमधील भूखंडासाठी हाच दर 3 लाख 16 हजार रुपये इतका नमूद करण्यात आला आहे.
नेरुळ, सानपाडा आणि खारघरमधील भूखंडांना विक्रमी दर मिळाल्यामुळे सिडकोने भूखंडांच्या मूळ दरातही मोठी वाढ केली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये नेरुळ येथील सेक्टर 28 मधील एका भूखंडाला 7 लाख 65 हजार रुपये चौरस मीटर इतका विक्रमी दर मिळाला होता. त्यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये नेरुळमधील एक भूखंड 6 लाख 46 हजार रुपये चौरस मीटर या दराने विकला गेला होता. ही चढ्या दराने होत असलेली विक्री लक्षात घेऊन सिडकोने आता खारघर येथील 41 हजार 994 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाचा मूळ दर 3 लाख 51 हजार रुपये इतका ठेवला आहे.
साडेबावीस आणि साडेबारा टक्केच्या भूखंडांचे दर आणखी वाढणार असून ज्या प्रकल्पग्रस्तांना अद्याप सिडकोने भूखंड वाटप केले नाहीत त्यांना फायदा होणार आहे. शिवाय उलवे, खारघर, सीवूड्स, सीबीडी-बेलापूर, उरण, पनवेल येथील घरांच्या किमती 25 टक्के वाढणार असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. काही शेतकऱ्यांनी भूखंडाची आगाऊ रक्कम घेतल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील आकडेवारीनुसार, गेल्या 12 महिन्यांत नवी मुंबई आणि आसपासच्या प्रमुख मायक्रो-मार्केट्समध्ये प्रॉपर्टी दरांमध्ये 15 टक्क्यांपासून 35 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे.