मुंबई : नमिता धुरी
मुंबईत सध्या पुनर्विकासाच्या विविध प्रकल्पांना वेग आला असून यातून म्हाडाला मोठा गृहसाठा उपलब्ध होणार आहे. एकट्या मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पातून किमान 7 हजार घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच आणखी 4 प्रकल्पांतून साधारण अडीच हजार घरे उपलब्ध होणार आहेत. मात्र यातील बहुतांश घरे अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी असतील.
मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहातर्फे राबवण्यात येणार असून त्यातून म्हाडाच्या वाट्याला 3 लाख 97 हजार 100 चौरस मीटर इतके क्षेत्रफळ येणार आहे. यावर किमान 7 हजार घरे बांधली जातील. अभ्युदयनगर पुनर्विकास प्रकल्पासाठी दोन विकासकांमध्ये स्पर्धा असून आर्थिक निविदा उघडल्यानंतर विकासक निश्चित केला जाईल. यात 40 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ म्हाडाला उपलब्ध होणार असून त्यावर अंदाजे 725 घरे बांधली जातील. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यास किमान 7 वर्षे लागणार आहेत.
सिंधी कॉलनी पुनर्विकास प्रकल्प रुस्तमजीकडून राबवला जात आहे. यात 25 हजार 700 चौरस मीटर क्षेत्रफळावर म्हाडासाठी 460 घरे बांधली जातील. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प अद्याप निविदेच्या स्थितीतच आहे. येथे म्हाडाला मिळणार्या 44 हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर 800 घरे बांधली जातील. हे दोन्ही प्रकल्प 4 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. समूह पुनर्विकासातून उपलब्ध होणार्या गृहसाठ्यातील बहुतांश घरे अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी असतील.
पीएमजीपी प्रकल्पातून 638 घरे
जोगेश्वरी येथील पीएमजीपी वसाहतीची निविदा अंतिम झाली आहे. म्हाडा स्वत: हा प्रकल्प राबवत असून यासाठी बी. जी. शिर्के या विकासकाची नियुक्ती झाली आहे. या प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी 524 घरे बांधण्यात येणार असून त्यांचे चटई क्षेत्रफळ 38 ते 56 चौरस मीटर असेल. याच प्रकल्पात मध्यम उत्पन्न गटासाठी 114 घरे बांधण्यात येणार असून त्यांचे चटई क्षेत्रफळ 64 ते 78 चौरस मीटर असेल. तसेच 12 ते 47 चौरस मीटर चटई क्षेत्रफळाचे 30 व्यावसायिक गाळे बांधले जातील. याशिवाय 942 रहिवासी आणि 42 व्यावसायिक गाळ्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.