नवी मुंबई : सध्या राज्यात सुरु असलेल्या संततधार पावसाचा भाज्यांच्या पिकांना देखील फटका बसला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांची टंचाई निर्माण झाली असून त्यांचे दर देखील वधारले आहे. आवक कमी असल्याने मागणीइतका पुरवठा होत नसल्याने भाज्यांच्या किमतीही किरकोळ बाजारात किलोमागे शंभरीपार गेल्या आहेत.
नवरात्रोत्सवानंतर भाज्यांचे दर आटोक्यात येण्याची शक्यता होती. पण सध्या सुरु असलेल्या पावसामुळे भाज्या खराब होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत दर चढेच राहतील, असा अंदाज भाजी विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मुसळधार पावसाचा फटका पालेभाज्यांना जास्त बसला आहे. त्यातुलनेत फळ भाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत.
दर वाढल्यामुळे भाज्या खरेदी करताना गृहिणींना पाकीट रिकामे करावे लागत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी भाज्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. आताही त्याचाच परिणाम म्हणून बाजारात भाज्या कमी प्रमाणात येत आहेत. एपीएमसीत नियमित 600 गाडयांची आवक होत असते. पण सध्या केवळ 400 ते 450 गाड्यांची आवक होत आहे. बाजारात भाज्यांचा तुटवडा जाणवत असल्याने दर वधारले आहेत.
उत्तरांखड, हिमालच प्रदेश, पंजाब येथून एपीएमसी बाजारात वाटाणा येत असतो. पण येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्यामुळे त्या राज्यांतील वाटाणा देखील एपीएमसी बाजारात कमी येत येत आहे. त्यामुळे वाटाण्याचे देखील दर वधारले आहेत. सध्या बाजारात नाशिक, सातारा, पुणे, गुजरात, नगर येथून भाज्या येत आहेत. पण पावसामुळे भाज्या खराब होत असल्याने भाज्यांचा दर्जा उच्च प्रतीचा नाही. तर घाऊकपेक्षा दुपटीहून अधिक दराने किरकोळ बाजारात भाज्यांची विक्री केली जात आहे.
एपीएमसी घाऊक बाजारातील दर (प्रति किलो)
काकडी 18 ते 28 रु.
टॉमटो 16 ते 20 रु.
परसबी 50 ते 60 रु.
शेवंगा 30 ते 40 रु.
गाजर 16 ते 18 रु.
वाटाणा 120 ते 150 रु.
फ्लॉवर 12 ते 14 रु.
वांगी 20 ते 24 रु.
गवार 120 ते 140 रु.
दुधी 30 ते 40 रु.
पालक 15 ते 20 रु.
शेपू 10 ते 12 रु.
मेथी 8 ते 10 रु.
कोथिंबीर 8 ते 10 रु.
शिमला मिरची 30 ते 32 रु.
कारली 24 ते 28 रु.