

नरेश कदम
मुंबई ःमराठीसाठी मी कोणतेही वाद मिटवायला तयार असल्याचे सांगून उद्धव ठाकरे गटाशी युतीसाठी पुढाकार घेणाऱ्या राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कमी जागा घेतल्या. उद्धव ठाकरे गटाने 65 जागा देण्याची ऑफर असताना, राज ठाकरे यांनी 56 जागांवर समाधान मानले. याबद्दल मनसेचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात गेली अनेक दिवस मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपांची चर्चा सुरू होती. आठवडाभरापूर्वी ठाकरे बंधूंचा जागावाटपांचा फॉर्म्युला अंतिम झाला तेव्हा राज ठाकरे यांच्या मनसेला 65 जागा दिल्या होत्या, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा देण्याचे ठरले होते. उर्वरित जागा उद्धव ठाकरे गटाला देण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्ष उमेदवारांनी फॉर्म भरले तेव्हा मनसेने 56 उमेदवारांचेच अर्ज दाखल करण्यात आले. मराठीबहुल विधानसभा क्षेत्रात मनसेने सहा वॉर्डपैकी दोन वॉर्डची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात शिवडी, वरळी, दादर माहिम, वडाळा अशा मराठीबहुल भागात मनसेने दुसऱ्या जागेसाठी खूप हट्ट धरला नाही.
बाळा नांदगावकर यांच्या मुलीसाठी शिवडी विधानसभा मतदारसंघातील 203 वॉर्ड हवा होता, पण ती जागा मनसेने सोडली. नांदगावकर यांनी शिवडीतून विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांना या वॉर्डात मताधिक्य होते. त्यामुळे ही जागा बाळा नांदगावकर यांच्या मुलीसाठी हवी होती. मात्र, ही जागा ठाकरे गटाने सोडण्यास नकार दिला. वरळी विधानसभेतही 198 आणि 199 यापैकी एक वॉर्ड मनसेला हवा होता, पण हे दोन्ही वॉर्ड ठाकरे गटाकडे गेले. त्यामुळे गिरणगावात मनसेला जितक्या जागा मागितल्या त्या तुलनेत खूप कमी जागा दिल्या. राज ठाकरे यांनी जागावाटपात तडजोडी केल्या की त्यांच्याकडे तेवढ्या ताकदीचे उमेदवार नव्हते असा प्रश्न आहे. की उत्तर भारतीय आणि मुस्लिम विरोधामुळे जास्त जागा उद्धव ठाकरे गटाला देण्यात आल्या, असे बोलले जाते. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांमध्ये सहानुभूती आहे. त्यामुळे त्यांना तेथे फायदा मिळू शकेल.