

मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) निवडणुकीत भाजप समर्थित परिवर्तन पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला असून इंडियन मेडिकल असोसिएशन संलग्न आयएमए सदस्य एमएमसी पॅनलने नऊपैकी तब्बल आठ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. डॉक्टर मतदारांनी दिलेल्या या निकालाने भाजपची संपूर्ण निवडणूक रणनीती कोलमडून पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रचंड संख्याबळ, मोठे नेते, काटेकोर बूथ व्यवस्थापन यावर भर देऊनही भाजप समर्थित पॅनलला अपेक्षित यश मिळू शकले नाही. मतदानादिवशी मंत्री आशिष शेलार यांची मतदान केंद्रांवरील सक्रिय उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली; मात्र त्याचा निकालावर कोणताही परिणाम झाला नाही.
राजकीय हस्तक्षेपाला डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिल्याचे या निकालातून दिसून आले. व्यावसायिक स्वायत्त संस्थांमध्ये राजकारणाला स्थान नाही, असा ठाम संदेश या निवडणुकीतून देण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीपूर्वी ऑनलाईन बैठका घेऊन आयएमए ऑफिशियल पॅनलचा विजय सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. प्रत्येक पदाधिकाऱ्याला किमान पाच डॉक्टर मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आदींच्या माध्यमातून मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्याची व्यवस्था करण्यात आली. तरीही हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या उज्ज्वला किशनराव कराड दहीफळे या भाजप समर्थित पॅनलमधील एकमेव विजयी उमेदवार ठरल्या. उर्वरित सर्व प्रमुख जागांवर आयएमए सदस्य पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
ठाण्यातील संतोष अप्पासाहेब कदम यांना सर्वाधिक मते मिळाली असून इतर विजयी असे : नांदेडचे संजय साहेबराव कदम, नाशिक येथील निलेश वसंतराव निकम, नागपूर येथील संजय गणेशराव देशपांडे, पुणे येथील सुनील माधवराव इंगळे, जळगाव येथील अनिलकुमार भास्कर पाटील, चंद्रपूर येथील मंगेश मधुकर गुलवडे, मुंबई येथील अनिल शंकर पाचनेकर.
आम्ही दिवसाचे 18 तास काम करणारे डॉक्टर आहोत. कठोर परिश्रम हीच आमची ओळख आहे. 15 माजी अध्यक्षांच्या निःस्वार्थ पाठिंब्यामुळे हा विजय शक्य झाला. स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप अजिबात मान्य नाही.
डॉ. सुहास पिंगळे, अध्यक्ष, एमएमसी