Mithi Scam Investigation
मुंबई : मिठी नदी गाळ काढण्यात झालेल्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने पंधरा ठिकाणी छापे टाकले. त्यात घोटाळ्यातील संबंधित कंत्राटदारासह कंपनीचे मालक, सिनेअभिनेता दिनो मोरिया, त्याचा भाऊ सॅटिनो मोरिया, मध्यस्थाच्या घरासह कार्यालयाचा समावेश आहे.
या कारवाईत काही आक्षेपार्ह कागदपत्रांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले असून या कागदपत्रांची शहानिशा सुरु आहे. याच प्रकरणात संबंधितांवर लवकरच मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मिठी नदी गाळ काढण्यात किमान 1200 कोटींचा भ्रष्टाचार झाला असा अंदाज आहे. त्यापैकी सुमारे 65 कोटींच्या गैरव्यवहाराचे पुरावे हाती आल्याने तेराजणांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत दलालाची भूमिका पार पाडणारा केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. यातील केतन हा दिनो आणि सॅटिनो मोरिया यांच्या संपर्कात होता. त्यामुळे या दोन्ही बंधूंची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोनदा कसून चौकशी करण्यात आली. याच चौकशीतून या संपूर्ण प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचे उघड झाले. ही माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून ईडीला देण्यात आली आणि ईडीने गंभीर दखल घेत स्वतंत्र तपास सुरु केला. त्याचाच एक भाग म्हणून ईडीने शुक्रवारी मुंबईसह केरळमधील कोची शहरात छापे टाकले.
गाळ काढण्याची यंत्रसामग्री पुरविणार्या कंपनीपैकी एक मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कोचीची कंपनी आहे. त्यामुळे ईडीने शुक्रवारी मुंबईसह केरळ शहरात या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून अभिनेता दिनो मोरिया, काही महानगरपालिका अधिकारी आणि कंत्राटदारासह इतरांच्या घरांसह कार्यालयात छापे टाकले होते. जवळपास पंधरा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. मोरिया बंधू वांद्रे येथे राहत असून तिथेही ही कारवाई करण्यात आली.
बॉलीवूडचा एकेकाळचा अभिनेता आणि मिठी घोटाळ्यातील संशयित आरोपी दिनो मोरिया याच्या वांद्रे निवासस्थानाची ईडी पथकाने शुक्रवारी तब्बल 14 तास झडती घेतली. या झाडाझडतीत अनेक कागदपत्रे पथकाच्या हाती लागल्याचे समजते. त्याच्या घराबाहेर वृत्तवाहिन्यांचे पत्रकार काही हाती लागते का म्हणून तिष्ठत उभे होते.
महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी गाळ काढण्याच्या कंत्राटासाठी निविदा अशा प्रकारे तयार केल्या की, त्याचा फायदा यंत्रसामुग्रीच्या एका विशिष्ट पुरवठादाराला झाला होता. ही कंत्राटदार कंपनी केरळच्या कोची शहराची असल्याने मुंबईसह केरळ येथे एकाच वेळेस छापे टाकले गेले. याच कंपनीने महानगरपालिकेला बोगस बिल दिल्याचाही आरोप आहे.