Mumbai Lake Clean up
मुंबई : महापालिकेची यंत्रणा पवई तलावातील जलपर्णीपुढे तोकडी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने मनुष्यबळ आणि यंत्रणेत वाढ करीत तलावाला पडलेला जलपर्णीचा वेढा तोडण्यात यश मिळवलेे आहे. गेल्या दहा दिवसांत 1 हजार 450 मेट्रिक टन जलपर्णी तलावातून काढली आहे.
गेल्या महिन्यात घेतलेल्या आढवा बैठकीत पवई तलावाची स्वच्छता युद्धपातळीवर करण्याचे प्रशासनाने ठरवले होते. त्यानुसार 23 मे पासनू हे काम 5 संयंत्रांद्वारे हाती घेण्यात आले. हार्वेस्टर मशीन, पंटून माउंटेड पोकलेन आणि पोकलेन, डंपर या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही कामे सुरू आहेत. त्यासाठी दोन सत्रांमध्ये अधिकचे मनुष्यबळ वापरले जात आहे.
पावसाळ्यानंतर सहा संयंत्रे तैनात करण्यात येणार आहेत. जलपर्णीची मुंबई महानगराबाहेरील क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावण्यात येत आहे. तलावातील जलपर्णी काढताना जैव विविधतेस कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या संस्थेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली जात आहे.
पवई तलाव हा सन 1891 मध्ये निर्माण करण्यात आला असून त्याचा संपूर्ण जलव्याप्त परिसर 223 हेक्टर इतका आहे. 6.6 किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 600 हेक्टर पर्यंत पसरलेले आहे. तलावाची जलधारणा क्षमता ही सुमारे 5 हजार 455 दशलक्ष लीटर इतकी आहे. त्याचे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी उपयोगात येते.