

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकीवर आज विधानसभेत जोरदार चर्चा झाली. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
आदित्य ठाकरेंना देण्यात आलेली धमकी ही कर्नाटकमधून आल्याचे समोर आले आहे. मलिक यांनी गौरी लंकेश, दाभोळकर आणि पानसरे यांच्याही हत्येचं कनेक्शन कर्नाटक असल्याचे मलिक यांनी विधानसभेत सांगितले तसेच त्यांनी ट्विटरवरूनही माहिती दिली आहे.
नवाब मलिक म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची गरज आहे. वारंवार नेत्यांना धमकीचे फोन येत आहेत. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपच्या एका नेत्याने ३० लाख रुपये वाटून ट्वीटरवर ट्रेंड आणला,असा आरोपही यावेळी नवाब मलिक यांनी केला.
कलबुर्गी, दाभोळकर, गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातनसारख्या संस्था आहेत. बऱ्याच मंत्र्यांना धमक्या येत आहेत त्याचे कनेक्शन कर्नाटक आहे त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. दरम्यान, नवाब मलिक यांनी मागणी केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसआयटी स्थापन करत असल्याचे जाहीर केले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशात विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. राज्याच्या एका मंत्र्यांनाच धमकी कशी येते, पोलीस दल काय करतंय, असे प्रश्न विचारण्यात आले. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सविस्तर निवेदन दिले.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, "ज्या भावना सदस्यांनी सभागृहात व्यक्त केल्या आहेत त्या आणि वेगवेगळ्या सदस्यांच्या तक्रारी लक्षात घेतल्या आहेत. विधानसभा सदस्य किंवा एखादा सामान्य नागरिक त्याच्याही आयुष्याची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. या विषयाचा अभ्यास करून राज्यस्तरावर एसआयटीची स्थापना करून त्या माध्यमातून आलेल्या धमक्या, घडलेली घटना आणि भविष्याकाळात त्यासाठी करायची उपाययोजना यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल", असं आश्वासन त्यांनी दिलं.
हेही वाचलं का?