

मुंबई : आझाद मैदानासह दक्षिण मुंबईत सतत होणारी आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे मुंबईबाहेर हलवा, अशी खळबळजनक मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
आझाद मैदानात पाच दिवस चाललेल्या उपोषण आंदोलनाचा त्रास कुणाला झाला, या आंदोलनावर कुणी नाके मुरडली हे आता या पत्रावरून स्पष्ट होत आहे. त्यासोबतच अशा आंदोलनांना दक्षिण मुंबईचे दरवाजे कायमचे बंद करण्याची भूमिका घेणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधित्व देवरा करत असल्यामुळे त्यांच्या या पत्रावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देवरा म्हणतात, निषेध आंदोलन करण्याचा हक्क लोकशाहीत आवश्यक असला तरी कोणताही अडथळा न येता काम करण्याचा आणि जगण्याचा हक्क सामान्य माणसांनाही आहे. या दोन हक्कांचा समतोल सांभाळणे आवश्यक आहे. दक्षिण मुंबई म्हणजे राज्य कारभाराचे हृदयस्थान होय. त्यासोबतच राजकीय आणि आर्थिक घडामोडींचा केंद्रबिंदूदेखील दक्षिण मुंबईतच आहे. याच दक्षिण मुंबईत मंत्रालय येते, विधानसभा येते, मुंबई महापालिकेचे मुख्यालय येते आणि मुंबई व महाराष्ट्र पोलिसांची मुख्यालयेदेखील दक्षिण मुंबईतच आहेत.
नौदलाच्या पश्चिम विभागीय मुख्यालयाचे कार्यालयदेखील दक्षिण मुंबईत आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, उद्योग समूहांची मुख्यालये आणि लाखो लोक ज्या पायाभूत सुविधांवर अवलंबून आहेत त्या सुविधा देणारी कार्यालयेदखील दक्षिण मुंबईत आहेत. देवरा म्हणतात, निषेध आंदोलनांमुळे राज्य कारभार, सुरक्षा व्यवस्था आणि अर्थचक्र ठप्प होण्याची परवानगी जगात राजधानीचे कोणतेही शहर देत नाही. आंदोलने लोकशाहीचे अविभाज्य अंग असली तरी अशा आंदोलनांची जागा ही राजकारभाराच्या, प्रशासनाच्या आणि सुरक्षा दलांच्या तसेच खासगी क्षेत्राच्या कामांत अडथळा बनता कामा नये.
यापुढे दक्षिण मुंबईत अशी आंदोलने होणार नाहीत, ती दक्षिण मुंबईतील जागांपासून इतरत्र हलवली जावीत, अशी विनंती खा. देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आंदोलनांच्या जागा दक्षिण मुंबईतून बाहेर हलवल्यास देशाची निर्विवाद आर्थिक राजधानी म्हणून, महाराष्ट्राची राजकीय राजधानी म्हणून मुंबई काम करू शकेल, असे ते म्हणतात.
दक्षिण मुंबईत प्रामुख्याने हुतात्मा चौक आणि आझाद मैदान या दोनच ठिकाणी आंदोलने उपोषणे होतात. ही आंदोलने दीर्घकाळ चालली आणि मुंबई ठप्प झाली, असे होत नाही. सलग पाच दिवस चालले ते परवाचे मराठा आंदोलन. त्यामुळे आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर तेवढा ठप्प झाला होता. मात्र, त्यामुळे कार्यालये बंद पडली, असे घडले नाही. मात्र, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच देवरा यांनी सरसकट सर्वच आंदोलने दक्षिण मुंबईबाहेर काढा, अशी भूमिका घेतली आहे.
माझे मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र हे मुंबईतील आंदोलने बंद करण्यासाठी नव्हते, तर सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये अशी भूमिका घेणारे होते, अशी मखलाशी खा. देवरा यांनी नंतर केली. घूमजाव करण्याचा प्रयत्न करत माझे पत्र नीट वाचा, असे देवरा म्हणाले. याच चौकटीत देवरा यांचे पत्र दिले आहे. या पत्राची मागणीच आंदोलने दक्षिण मुंबईबाहेर हाकला अशी आहे आणि शेवटच्या परिच्छेदात तर त्यांनी स्पष्ट शब्दांत आंदोलने दक्षिण मुंबईबाहेर काढण्याचा आग्रह धरला आहे.
आझाद मदान म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्याताल तमाम जनतेचे आणि विविध घटकांचे आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठीचे ठिकाण. याठिकाणी आजवर झालेल्या उपोषण-आंदोलनांनी सरकारला महत्वपूर्ण निर्णय घेण्यास भाग पडले. सामान्यांचे हेच हक्काचे व्यासपीठ बंद करा आणि आंदोलनाच्या जागा दक्षिण मुंबईबाहेर हलवा, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
देवरा यांनी ही मागणी शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे केली की व्यक्तिगत हे स्पष्ट झालेले नाही. देवरा यांच्या मागणीवर शिंदे सेनेतून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने अद्याप देवरा यांच्या पत्राची दखल घेतलेली नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मिलिंद देवरा यांनी कधी आंदोलन केले आहे का? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या या माणसाला आंदोलनाबाबत काय माहिती असणार?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे. मुंबईत मराठी माणूस न्याय्य मागण्यांसाठी एकवटला, त्याबद्दल यांची पोटदुखी उघड झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरणे आता बंद करा, असेही त्यांनी सुनावले. देवरांच्या मागणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहमत नसतील, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुंबईत आंदोलन करणे मराठी माणसाचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आणि आंदोलनांच्या जागा दक्षिण मुंबईतून बाहेर हलवण्याच्या शिवसनेच्या मागणीला विरोध केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृहविभागाने योग्यरीत्या आंदोलन हाताळले असून ते देवरा यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहणार नाहीत, अशी अपेक्षा परांजपे यांनी व्यक्त केली.