

Veerangana Jhalkaribai Koli Women's Social Organization
मुंबई : महाराष्ट्रातील आदिवासी महादेव, मल्हार कोळी, ढोर, टोकरे आदी जमातींना १९५० पूर्वीचा 'कोळी' नोंदीचा पुरावा विचारात घेऊन अनुसूचित जमातीचे (एस.टी) प्रमाणपत्र मिळण्यासाठी तत्काळ शासन निर्णय व्हावा, अशी मागणी वीरांगणा झलकारीबाई कोळी स्त्री सामाजिक संस्थेने केली आहे. या मागणीसाठी संस्थेच्या अध्यक्षा गीतांजली कोळी यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता.
राज्यात आदिवासी कोळी समाजाची लोकसंख्या सुमारे ७५ लाख इतकी आहे. या मागणीसाठी यापूर्वी ३ ते २८ मार्च २०२५ रोजी उन्हाळी अधिवेशनकाळात कुऱ्हाड मोर्चा काढला होता. त्यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. ८ मे २०२५ रोजी बैठकीत आदिवासी कोळी जमातीचे पुरावे देऊन सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी बावनकुळे यांनी १९५० पुर्वीचा कोळी नोंदीचा पुरावा विचारात घेऊन अनूसुचित जमाती चे (एस.टी) प्रमाणपत्र द्यावे असा शासन निर्णय काढू व जमातीला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर याविषयी पाठपुरावा केला. परंतु चार महिने झाले तरी शासन निर्णय काढण्यात आला नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण सुरू केले आहे.