

MHADA Officials Controversy
मुंबई : बृहतसूचीवरील भाडेकरूंना घरे देताना त्यात घोटाळा झाल्याची तक्रार खेरवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे; मात्र अपात्र भाडेकरूंना बेकायदेशीरपणे घरे देणार्या म्हाडाच्या अधिकार्यांवर कारवाई होत नसल्याबाबत नाराजी आहे.
ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा बृहतसूची सोडतीमध्ये शेकडो घरे लाटली जात आहेत. वारंवार गुन्हे दाखल होत असल्याने या सोडतीत घोटाळा होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतचा पहिला गुन्हा 2023 साली पायधुनी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. यामध्ये सॅम्युएल स्ट्रीट इमारतीमध्ये 18 बोगस भाडेकरू वाढवले असल्याचे लक्षात आले. बोगस भाडेकरू, कार्यकारी अभियंता व उपमुख्य अधिकारी यांची नावे त्यात नोंदवली गेली होती. या प्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाही.
अलीकडेच दुसरा गुन्हा खेरवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. पायधुनी गुन्ह्यात ज्या 16 लोकांची नवे नमूद आहेत त्यांना कोट्यवधी रुपयांची घरे दिली जात असल्याबाबत पेठे यांनी ईमेलद्वारे तक्रार केली होती. या सगळ्यात ज्यांनी बोगस भाडेकरूंचा समावेश पात्रताधारकांच्या यादीत केला त्या कार्यकारी अभियंता व मास्टर लिस्ट समितीवर गुन्हे का दाखल केले जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
म्हाडाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पात्रताधारकांची यादी फार जुनी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकार्यांनी अनेक वर्षांपूर्वी पात्र भाडेकरूंची यादी तयार केली होती. तशीच दिसणारी यादी म्हाडाकडे सादर करण्यात आली. त्यामुळे या यादीतील अपात्र भाडेकरूंनाही बेकायदेशीररित्या घरे मिळवता आली. आता ही घरे परत घेतली जाणार आहेत.