

मुंबई : आरे ते कफ परेड मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या बांंधकामादरम्यान पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांपैकी केवळ 35 टक्के झाडे जगली आहेत. तसेच बांधकामासाठी तोडण्यात आलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावण्यात आलेल्या झाडांपैकी निम्मीच झाडे आज जिवंत आहेत.
आरे ते कफ परेड ही 33.5 किमी लांबीची भुयारी मेट्रो मार्गिका टप्प्याटप्प्याने सुरू झाली. ऑक्टोबर 2024 मध्ये आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू झाला. त्यानंतर बीकेसी ते वरळी टप्पा मे 2025मध्ये सुरू झाला. ऑक्टोबर 2025मध्ये या मार्गिकेचा विस्तार कफ परेडपर्यंत करण्यात आला. या मार्गिकेच्या बांधकामात अनेक झाडे बाधित झाली. आरे वसाहतीतील कारशेडच्या बांधकामाला पर्यावरणप्रेमींकडून प्रचंड विरोध झाला.
मेट्रो स्थानकांच्या बांधणीत 2 हजार 800 झाडांचा बळी गेला, तर कारशेडच्या बांधकामात तब्बल 2 हजार 141 झाडे बाधित झाली. याची भरपाई म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने 1 हजार 643 झाडांचे पुनर्रोपण आरे आणि अन्य 31 ठिकाणी केले. तसेच 20 हजार 460 रोपांची नव्याने लागवड केली. यापैकी अनेक झाडांची स्थिती आज चांगली नाही. काही झाडांची खोडे सुकली आहेत, तर काहींच्या खोडांवर शेवाळ धरले आहे. काही झाडांवर बुरशी आली आहे.
नव्याने लावलेल्या रोपांपैकी काही रोपे आता त्या जागी नाहीत. काही रोपे बांधकामाच्या राडारोड्यात गाडली गेली आहेत. काही झाडे तीन-चार फुटांपर्यंत वाढली आहेत; मात्र त्यांच्यातील अंतर असमान आहे. काहींच्या भोवती खळे केलेले नाही. वन अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी केवळ 50 टक्के रोपे शिल्लक आहेत, तर पुनर्रोपण झालेल्या झाडांपैकी केवळ 35 टक्के झाडे जिवंत आहेत.
टप्प्याटप्प्याने ऱ्हास
पर्यावरण कार्यकर्ते झोरू बाथेना यांच्या तक्रारीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली होती. या समितीने पुनर्रोपित झाडांच्या नोव्हेंबर 2019मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, 1 हजार 643 पैकी 61 टक्के झाडे मेली होती. जानेवारी 2018मध्ये हे प्रमाण 42 टक्के होते. त्यात मे 2019 रोजी 56 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. एमएमआरडीएने 2020 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ 543 झाडे सुस्थितीत आढळली.