मुंबई : आठ वर्षांपासून मेट्रोच्या गारेगार प्रवासाची स्वप्ने बघणार्या दक्षिण मुंबईकरांना सुखावणारा क्षण अखेर आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. गुरुवारपासून मुंबईकरांना या मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करता येईल. यामुळे आरे ते कफ परेड हा प्रवास एका तासात करणे शक्य होईल.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या 33.5 किमीच्या मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाले होते. त्यानंतर यावर्षी मे महिन्यात बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या टप्प्याचे लोकार्पण झाले. यामुळे मेट्रो दक्षिण मुंबईच्या दाराशी येऊन ठेपली. पण मुंबईचे शेवटचे टोक गाठण्यासाठी आणखी चार महिने लागले. अखेर वरळीत खोळंबलेली भुयारी मेट्रो कफ परेडला प्रस्थान करण्याची वेळ आली आहे.
सीएसएमटी, चर्चगेट या अतिमहत्त्वाच्या रेल्वे स्थानकांतून प्रवास करणार्या लाखो प्रवाशांना भुयारी मेट्रोमुळे दिलासा मिळेल. काही मिनिटांच्या कालावधीत इच्छित स्थळी पोहोचता येईल. तसेच रेल्वेगाड्यांमध्ये होणार्या तुडुंब गर्दीपासून सुटका होईल अशी आशा प्रवाशांना आहे. लोकार्पणाची तारीख जाहीर झाली तरी सीएमआरएस प्रमाणपत्राबाबत स्पष्टता नव्हती. मात्र लोकार्पणाच्या पूर्वसंध्येला हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचे एमएमआरसीने जाहीर केले. त्यामुळे गुरुवारपासून ही मार्गिका सामान्य प्रवाशांसाठी खुली होणार आहे.
पहिली फेरी : सकाळी 5.55 वाजता (आरे जेव्हीएलआर ते कफ परेड)
शेवटची फेरी : रात्री 10.30 ते 11.25 (आरे जेव्हीएलआर ते कफ परेड)
किमान तिकीट (एकेरी प्रवास) - 10 रुपये तर कमाल तिकीट (एकेरी प्रवास) - 80 रुपये