Chemists Strike : औषध दुकान बंदला मुंबईसह एमएमआरमध्ये जोरदार प्रतिसाद

औषधांसाठी नागरिकांची धावपळ; जुलैनंतर बेमुदत संपाचा इशारा
Chemists Strike
मुंबई ः मुंबईतील सर्वच औषध दुकानदार या एकदिवसीय बंदमध्ये सहभागी झाले होते. केवळ रुग्णालयात असलेली दुकानेच सुरू होती. (छाया ः दीपक साळवी)
Published on
Updated on

मुंबई : औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला बुधवारी मुंबईसह एमएमआर परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. गल्ली-बोळांतील आणि नाक्यांवरील मेडिकल दुकाने बंद होती, मात्र सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील इन-हाउस मेडिकल सेवा सुरू असल्याने रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. तरीही औषधे मिळवण्यासाठी अनेकांना धावपळ करावी लागली.

सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर जुलैनंतर बेमुदत संप पुकारण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. जुलैमधील बैठकीनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.

Chemists Strike
Satara: जिल्ह्यातील 3,250 मेडिकल आज बंद

संघटनेच्या माहितीनुसार देशभरातील सुमारे 12.4 लाख मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली. महाराष्ट्रात अंदाजे 1 लाख 35 हजार, तर मुंबईत सुमारे 7 हजार केमिस्ट आणि संबंधित व्यावसायिकांनी बंद पाळल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आला.

बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने आधीपासूनच तयारी केली होती. सात झोनसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले होते. एफडीएतील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मेडिकल बंद असल्याबाबत दिवसभरात सुमारे 15 ते 20 कॉल प्राप्त झाले. संबंधित नागरिकांना जवळपास सुरू असलेल्या मेडिकल दुकानांची माहिती देण्यात आली. काही नागरिकांनी नंतर औषधे मिळाल्याचा प्रतिसादही दिला.

मुंबईतील 47 मेडिकल दुकानांची यादी प्रशासनाने जाहीर केली होती, जिथे अत्यावश्यक औषधे उपलब्ध होती. तसेच प्रमुख रुग्णालयांबाहेरील डे-नाईट मेडिकल दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, औषधे मिळालीच नाहीत, अशी एकही तक्रार आलेली नाही.

शताब्दी रुग्णालयाबाहेरील मेडिकल सुरू

कांदिवली येथील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयासमोरील ‌‘गेट वेल‌’ मेडिकल दुकान सुरू असल्याचे दिसून आले. दुकानातील कर्मचाऱ्याने सांगितले की, सुरुवातीला दुकान बंद ठेवण्यात आले होते. मात्र परिसरातील इतर मेडिकल दुकाने बंद असल्याने ड्रग इन्स्पेक्टरच्या विनंतीनंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितले की, रुग्णालयात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा आधीपासूनच उपलब्ध होता.

Chemists Strike
Mumbai Gas Shortage: मुंबईत 40% हॉटेल्स बंद; गॅस सिलिंडर तुटवड्याने व्यवसाय संकटात

कूपर रुग्णालयाबाहेर पर्यायी व्यवस्था

विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयासमोरील मेडिकल दुकान बंद होते. दुकानावर पडदा टाकण्यात आला होता. चौकशी केली असता कर्मचाऱ्यांनी आपण बंदमध्ये सहभागी असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी रुग्णांना शेजारील खासगी रुग्णालयातील मेडिकल दुकानातून औषधे मिळू शकतील, अशी माहितीही दिली.

  • दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे दुपारी 3 वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. राज्य सरकारने केंद्र सरकारसोबत बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. या बंदमुळे औषध व्यवसायाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयांमधील मेडिकल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. तसेच आपत्कालीन रुग्णांसाठी औषधांची पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news