

सातारा : केंद्र सरकारच्या धोरणांतील विसंगती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे देशात विनापरवाना ऑनलाईन औषध विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असून, त्याविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी (दि. 20) देशव्यापी संप पुकारला आहे. या दिवशी मेडिकल दुकाने बंद ठेवली जाणार असून, जिल्ह्यातील 3 हजार 250 मेडिकल बंद राहणार असल्याची माहिती केमिस्ट असोसिएशनकडून दिली.
औषध विक्रेत्यांच्या मते, अनेक ई-कॉमर्स कंपन्या नियमांचे उल्लंघन करून थेट घरपोच औषध वितरण करत आहेत. या प्रक्रियेत रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनची किंवा औषधांच्या योग्य वापराची पुरेशी पडताळणी होत नसल्याचा आरोप केला आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉक्टरांच्या बनावट चिठ्ठ्या तयार करून नशा आणणारी किंवा घातक औषधे मागवली जात असल्याचा गंभीर मुद्दाही समोर आला आहे.
एकीकडे अवैध ऑनलाईन औषध विक्रीला मोकळीक दिली जात आहे तर दुसरीकडे पारंपरिक औषध विक्रेत्यांवर जाचक नियम लादले जात आहेत. जीएसआर 220 (ई) आणि जीएसआर 817 (ई) यांसारखे नियम तातडीने रद्द करावेत. ऑनलाईन औषध खरेदी धोकादायक आहे. डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर होण्याची शक्यता आहे. अशा विविध कारणांमुळे हा एकदिवसीय संप पुकारण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून शहरातील मंगलमूर्ती मेडिकल, साईअमृत मेडिकल, मोरया मेडिकल, माऊली मेडिकल अशी चार मेडिकल सुरू ठेवली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सागर पाटील, जिल्हा सचिव अभय गरगटे, तालुका उपाध्यक्ष महेश साळुंखे, सचिव महेंद्र कदम, खजिनदार रणजित मोहिते यांनी दिली.