MBBS BDS CAP Round 3: एमबीबीएस, बीडीएस प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर; २६ सप्टेंबरपर्यंत नोंदणी

११ ऑक्टोबरला निवड यादी, १४ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चिती
Girls Special Round
Girls Special RoundPudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्यातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची (कॅप) तिसरी फेरी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीसाठी ऑनलाइन नोंदणी, शुल्क भरणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया २२ ते २६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

तिसऱ्या फेरीची निवड यादी ११ ऑक्टोबरला जाहीर केली जाणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) अखिल भारतीय कोटा तसेच राज्य समुपदेशनासाठी जाहीर केलेले वेळापत्रक विचारात घेऊन सीईटी सेलने ही फेरी जाहीर केली आहे. दुसऱ्या फेरीनंतर एमबीबीएस आणि बीडीएसच्या रिक्त राहिलेल्या जागा तिसऱ्या फेरीत भरल्या जाणार आहेत.

Girls Special Round
Mumbai Cesarean Delivery Rate: मुंबईत ६०% प्रसूती सिझेरियनने? आकडे पाहून धक्का, पण तज्ज्ञांनी सांगितले वेगळे कारण!

तिसऱ्या फेरीसाठी एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी आणि ‘सेशन अप्लाय’ करण्याची मुदत २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. नोंदणी शुल्क ऑनलाइन भरण्याची मुदत त्याच दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत आहे. शुल्क यशस्वीरीत्या भरल्यानंतरच उमेदवाराची नोंदणी पूर्ण होणार आहे.

आवश्यक मूळ कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती २६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अपलोड कराव्या लागणार आहेत. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ‘सबमिट’ करणे बंधनकारक असून, ते न केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

नव्याने नोंदणी करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन कागदपत्र पडताळणी २८ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत उमेदवारांची एकत्रित यादी आणि तात्पुरती गुणवत्ता यादी २९ सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. त्यावर हरकती किंवा तक्रारी ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदविता येतील. मात्र, कोणत्याही दुरुस्तीसाठी संबंधित पुरावा कागदपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.

Girls Special Round
Mogra Pada Farmers: मेट्रोसाठी जमीन दिली, आता शेतकऱ्यांना मिळणार विकसित भूखंड; १९८ जणांना मोठा दिलासा!

५ ऑक्टोबरला अंतिम यादी

नोंदणीकृत उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी ५ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांची वर्गवारी ६ ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यानंतर ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवारांना महाविद्यालय व अभ्यासक्रमांचे प्राधान्यक्रम ऑनलाइन भरता येतील.

तिसऱ्या फेरीची निवड यादी ११ ऑक्टोबरला जाहीर होईल. निवड झालेल्या उमेदवारांना ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मूळ कागदपत्रे आणि आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा लागेल. त्यानंतरच्या ‘स्ट्रे व्हेकन्सी’ फेऱ्यांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे.

ईडब्ल्यूएस प्रवर्गातून दावा करणाऱ्या उमेदवारांकडे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वैध असलेले महाराष्ट्र शासनाच्या विहित नमुन्यातील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित प्रवर्गाचा दावा करणे तसेच जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि लागू असल्यास नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे.

ओबीसी आणि एसईबीसी उमेदवारांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. मात्र, निर्धारित मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news