मुंबई : मुंबईकरांचा सोमवारचा दिवस राजकीय घडामोडींनीच उजाडला. ते घराबाहेर पडले असताना त्यांचे लक्ष वेधले ते मुंबईत जागोजागी लावलेल्या फलकांनी. मराठी माणसा, मुंबई वाचव...ही तुझ्या अस्तित्वाची लढाई आहे, अशी भावनिक साद मुंबईकरांना घालण्यात आली होती.
हे फलक मुंबईत सर्वत्र झळकले असताना दुसरीकडे दुपारी महापालिका निवडणुकीची घोषणा झाली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मराठीचा आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हे मुद्दे चांगलेच पेटणार असून त्याची सुरुवात आचारसंहिता लागू झाल्यापासूनच झाल्याचे दिसत आहे. पायाखालची जमीन एकदा गेली तर ती परत मिळत नाही, अशी वाक्ये लिहून मुंबईतल्या मराठी माणसांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या बॅनरबाजीतून झाला आहे. मराठीसाठी तुला एकत्र यावे लागेल. तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे. यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावेच लागेल. नाहीतर मुंबई एकदा हातात निघून गेली, मग कायमचे रडत बसावे लागेल, अशी भावनिक साद मुंबईकरांना घातली आहे.