नाशिक : महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनच्या शाळांमध्ये २६ जानेवारीस देशभक्तिपर गीतांवर कवायत घेणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर परिपाठात राज्यगीत आणि शाळेत मराठी भाषा शिकवणे सर्व शाळांसाठी बंधनकारक करणार असल्याचे सांगत या निर्देशांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला.
महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते. ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांची कार्यपद्धती आणि त्यातून घडणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता देशात वेगळी ओळख निर्माण करत असल्याचा गौरव करत यूपीएससी परीक्षेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील ६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर आणि हिवाळी शाळेतील शिक्षक वारे गुरुजी आणि गावित यांच्या नवोन्मेषी कामाचा त्यांनी विशेष उल्लेख करत मनपा शाळांनीही अशाच कल्पक उपक्रमांचा आदर्श घ्यावा, असा संदेश दिला.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाइतकेच शाळेतील भौतिक सुविधा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. आधुनिक वर्गखोली, स्वच्छता, सुरक्षित परिसर, क्रीडा सुविधा आणि तंत्रसुसज्ज शिक्षणसाधने उपलब्ध असणे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनिवार्य आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केवळ वर्गातील अध्यापन पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी प्रास्ताविकात मनपा शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत गेल्या काही महिन्यात झालेला सकारात्मक बदल, डिजिटल शिक्षण, एआय आधारित अभ्यासक्रम, विज्ञान आणि गणित प्रयोग, वाचन उपक्रम, आनंदी शाळा, इस्रो वारी, स्मार्ट स्कूल यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. जागतिक बालिका हक्क दिनानिमित्त मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी दुर्वा मोरे हिचा गुणगौरव करत कामगिरीचे कौतुक केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, माजी नगरसेवक विलास शिंदे, प्रविण तिदमे, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
शिक्षणेतर कामांचा बोझा कमी करणार
शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिला शिल्पकार असतो. त्यामुळे शिक्षकांनी काळानुरूप आपले ज्ञान व कौशल्य अद्ययावत ठेवणे काळाची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करत शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा शासनातर्फे पुनर्विचार करत पुढील वर्षापासून शिक्षकांवरील कामांचा बोझा ५० टक्क्यांनी कमी केला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री भुसे यांनी दिले.