

Rajshree More Vs MNS
मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे नुकत्याच एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत तिच्या कारला धडक दिल्याचा आरोप तिने केला आहे. मुंबईतील अंधेरीत रविवारी रात्री ही घटना घडली. यानंतर राजश्रीने घटनास्थळाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फुटेजमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे.
''राहिल जावेद शेख...मनसे पार्टी... हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता. त्याने माझ्या कारला धडक दिली. मी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवले आहे,'' असे सांगत राजश्रीने घटनास्थळाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये राहिल पोलिसांसमोरच जोरदार वाद घालत अंगावर धावून जात असल्याचे दिसून आले आहे. त्याने शिवीगाळही केली आहे. ''माझा बाप मनसेचा उपाध्यक्ष आहे. पैसे घे...ठाण्याला जा...विचार, माझा बाप कोण आहे?'' असेही तो धमकावत असल्याचे व्हिडिओत दिसते.
राज्यात हिंदी आणि मराठी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर, राजश्रीने याआधी दावा केला होता आहे की, स्थलांतरित शहर सोडून गेल्यास मुंबईतील स्थानिक मराठी लोकांची परिस्थिती आणखी बिकट होईल. तिच्या या वक्तव्यानंतर, वर्सोवा येथील मनसे कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात राजश्री मोरे विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर राजश्रीने माफी मागत याबाबतचा वादग्रस्त व्हिडिओ डिलीट केला होता. राजश्री मोरे ही राखी सावंतची आधीची मैत्रिण आहे.