

Sukirt Gumaste Video viral
मराठीतील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आणि फूड-ट्रॅव्हल ब्लॉगर सुकीर्त गुमास्ते याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याने त्यात पुण्यातील एका हॉटेलातील वाईट अनुभव शेअर केला आहे. सुकीर्त त्याच्या सासू- सासऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यातील एका हॉटेलात असलेल्या बार्बेक्यू नेशनमध्ये कुटुंबीयासह जेवणासाठी गेला होता. तेथील मांसाहारी जेवणाचा दर प्रति व्यक्ती १,३०० रुपये होता. पण एवढे पैसे मोजूनही जेवणाचा दर्जा थर्ड क्लास असल्याचे सुकीर्तने त्रागाने म्हटले आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'तुम्ही बार्बेक्यू नेशनमध्ये का खायचे नाही?' याचे कारणही त्याने प्रत्यक्ष आलेला अनुभव शेअर करत सांगितले आहे.
''सासू सासऱ्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही हॉटेलच्या गच्चीवर बार्बेक्यू नेशनमध्ये आलोय. जर पैसे भरून डोक्याला त्रास करुन घ्यायचा असेल तर तुम्ही पुण्यातील बार्बेक्यू नेशनला या. भाजी, आईस्क्रीम चांगले नाही. व्हेज १,१०० रुपये, नॉन व्हेज १,३०० रुपये आहे. १,३०० रुपयांत चांगले जेवण अपेक्षित आहे. इथे सगळे अनलिमिटेड आहे. गच्चीवर हवेशीर आहे म्हणून आम्ही इथे आले. पण तेलाचा तंवग अतिशय वाईट आहे. चिकन कच्चे आहे. आईस्क्रीमसह एकही पदार्थ चांगला नाही. वाढून घ्यायला सुद्धा चांगले नाही. प्लेटा प्लॅस्टिकच्या आहेत. ४०० रुपयांची लायकी आहे का? १,३०० रुपये घेतात.'' असा सवाल सुकीर्तने व्हिडिओतून केला आहे.
मी नेहमी चांगल्या गोष्टी समोर आणतो. पण मी आज त्रागाने का बोललो, तर इथले जेवण पाहून...! आजच याला शटर लावा. कधीकधी मनस्ताप होतो. मला जी ठेच लागली आहे ती तुम्हाला लागू नये. म्हणून मी इथला अनुभव शेअर केल्याचे सुकीर्तने म्हटले आहे.
सुकीर्त गुमास्ते हा प्रसिद्ध फूड-ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. सुकीर्त हा प्रसिद्ध यूट्यूबर उर्मिला निंबाळकर हिचा पती आहे. सुकीर्तचे युट्यूबवर २ लाख ७४ हजार सबक्रायबर्स आहेत. सुकीर्त ट्रॅव्हल आणि फूड ब्लॉग बनवतो. तर उर्मिलाचे १५ लाख सबक्रायबर्स आहेत.
बार्बेक्यू नेशन ही भारतातील आघाडीच्या कॅज्युअल डायनिंग चेनपैकी एक आहे. सध्या भारतात त्यांची सुमारे २०० आउटलेट आहेत. युएई, मलेशिया, ओमानमध्येही त्यांनी आउटलेट सुरु केली आहेत. २००६ मध्ये याची सुरुवात झाली होती.