

मुंबई : फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, रिल्स, यू-ट्युब, शेअरचॅटसारख्या समाजमाध्यमांवर मराठी भाषेतील विविध बोलीभाषांचा वापर होत आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार, प्रसार होत असून त्यामुळे बोलीभाषांच्या स्वरूपाचे प्रतिबिंब समाजमाध्यमांतून बघायला मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. समाजमाध्यमांमुळे बोलीभाषा लोकल टू ग्लोबल बनल्याची भावना समाजमाध्यमांच्या अभ्यासकांनी यावेळी पुढारीसोबत बोलताना व्यक्त केली.
देशभर विखुरलेली या सर्वच परिसरातील मंडळी आपापल्या परीने फेसबुक, यू-ट्युब, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉटसॲप इत्यादी समाजमाध्यमांवर अभिव्यक्त होताना देवाणघेवाणीमध्ये बोलीभाषांचा वापर करत आहे. पोस्ट, व्हिडीओ, ग्राफिक्स, रिल्स, स्टोरिज, लाइव्ह व्हिडीओ, यू-ट्युब चॅनल्स आदी स्वरूपात बोलीभाषा सजीव ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मागील पाच-सहा वर्षांत समाजमाध्यमांवर बोलीभाषेतील आशयसंपन्न सादरीकरणामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या बोलीभाषांचा वापर करण्यात येत आहे. फेसबुक-इन्स्टावर पोस्ट, रिल्स, स्टोरीज या माध्यमातून तर यु-ट्यूबवर बोलीभाषेला वाहिलेल्या चॅनल्सच्या माध्यमातून मराठी भाषिकांना बोलीभाषेकडे आकर्षित केले जात असल्याचे असल्याचेही अभ्यासकांनी सांगितले.
धुळे, जळगाव, नंदुरबारकडे बोलणारी अहिराणी, मालवणी, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागात झाडीबोली, पूर्व विदर्भात बोलली जाणारी नागपूरी यासह लेवा बोली, तावडी, आगरी, वऱ्हाडी, देहवाली, बेळगावी, वाडवळी, तंजावर मराठी, नंदभाषासारख्या अनेक बोलीभाषा मराठीमध्ये बोलल्या जातात. असे असले तरीही नवतंत्रज्ञानाचा वापर करून बोलीभाषांच्या प्रचार-प्रसार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना आणि चळवळींना शासनस्तरावर प्रोत्साहनाची गरज आहे.
इंटरनेट विश्वात ग्लोबल ते लोकलचे मिश्रण असलेली ग्लोकल संस्कृती उदयास आली आहे. त्यामध्ये भाषा मोलाची भूमिका बजावत आहे. मराठी भाषेतील अनेक बोलीभाषांचे समाजमाध्यमांवर उमटत असलेले प्रतिबिंब हे मराठी भाषेच्या उज्ज्वल भवितव्याचे लक्षण आहे. त्यासाठी आपण नागरिक म्हणून अशा प्रयोगांना प्रतिसाद देणे आणि शासकीय स्तरावर अशा आशयाची निर्मिती करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे.
व्यंकटेश कल्याणकर, समाजमाध्यमांचे अभ्यासक
मराठी कंटेट इतर भाषिकांच्या स्पर्धेत कुठेही कमी नाही, पण त्यांच्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ हवे होते, म्हणून प्लॅनेट मराठीची सुरुवात केली. आम्ही हर प्रकारच्या कंटेंटला प्लॅनेट मराठीवर जागा देतो. ओटीटी प्लॅटफॉर्म व्यवसाय चालतो तो सबस्क्रायबर्सवर. जितके जास्त सबस्क्रायबर्स तितके पैसे, एवढे साधे गणित आहे. ओटीटीच्या माध्यमातून चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो. यातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याच, शिवाय नव्या टॅलेंटलाही वाव मिळाला आहे. चित्रपट, नाटके, सत्य घटनांवर आधारित व काल्पनिक कलाकृती, वेबसीरिज, डॉक्युमेंट्री या साऱ्यांची सांगड घालणारा हा एकमेव मराठी ओटीटी आहे.
अक्षय बर्दापूरकर, निर्माते, प्लॅनेट मराठी ओटीटी