

मुंबई : वर्दळीच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी मराठा मोर्चातील आंदोलकांनी अतिशय मुंबई महानगरपालिकेसमोरील मुख्य चौकात ठिय्या अशा मांडल्याने सामान्य नागरिकांचा खोळंबा झाला. आंदोलकांनी मुख्य चौकातच चूल मांडली. नाश्ता तयार केला. सीएसएमटी स्थानकातही प्रचंड गर्दी आणि घोषणाबाजी केल्याने अन्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सलग दुसऱ्या दिवशीही ईस्टर्न फ्री वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात सुरू केलेले उपोषण आता तिसऱ्या दिवसाकडे सरकले आहे. मात्र आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या मराठा बांधवांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने ते संतप्त होत आहेत.
खाण्यापिण्याची सोय नाही, स्टॉल बंद, हॉटेल बंद. अशा परिस्थितीत आंदोलकांची खाण्यापिण्याची आबाळ होत असल्याने सरकारचा निषेध करत त्यांनी सोबत आणलेली रसद वापरत रस्त्यातच चूल मांडली. पोहे आणि इतर नाश्ता तयार करण्यास सुरुवात केली. हे करत असताना आरक्षणाच्या घोषणाही सुरूच होत्या. शनिवारी सकाळच्या सत्रात या प्रकाराने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर वाहतूक कोंडीने अक्षरशः गुदमरला. आंदोलकांनी संपूर्ण सीएसएमटी चौक व्यापल्याने जीपीओ, मंत्रालय, पोलीस मुख्याल, जे. जे. उड्डाणपूल, उच्च न्यायालय या आणि अशा महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. बेस्ट बसच्या गाड्या, टॅक्सी, खासगी गाड्याही अडकून पडल्या. सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना लेटमार्क लागला.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आंदोलकांना रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी आझाद मैदानात आंदोलन करण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलक हटण्यास तयार नव्हते. शनिवार (दि.30) रोजी सकाळी ८ पासून सुरू झालेली वाहतूक कोंडी हटविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अखेर पोलिसांनी मनोज जरांगे यांनाच साकडे घातले. रस्ता मोकळा करून पोलिसांना सहकार्य करा असे आवाहन मग जरांगे यांनी १२.३० वाजताच्या सुमारास आंदोलकांना केले. जरांगेच्या काही कार्यकर्त्यांनीही येऊन आंदोलकांची समजूत काढली. तेव्हा कुठे रस्ता मोकळा होण्यास सुरूवात झाली. सकाळी ८ वाजता सुरू झालेली वाहतूक कोंडी दुपारी १२.३० वाजता फुटली.
शनिवारी (दि.30) रोजी सलग दुसऱ्या दिवशीही ईस्टर्न फ्री वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राज्यभरातून हजारो मराठा समर्थक मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्याने मुंबईत येणाऱ्या मुख्य ईस्टर्न फ्री वे महामार्गावर वडाळा-सीएसएमटी दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सकाळपासून वाहने रांगेत होती. वाहन चालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
आंदोलनात सहभागी समर्थक राहण्याची व खाण्याची व्यवस्था करत मोठमोठे ट्रक आणि वाहने मुंबईच्या दिशेने आणत असल्याने मुंबईत येणाऱ्या इतर रस्त्यांवरही अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली. पार्किंग मिळत नसल्याने महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी वाहने पार्क केल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मुंबईतील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. पण त्यांचीही चांगलीच दमछाक होत होती.
आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबईत राहायचे, असा निर्धार करून मराठा आंदोलक याठिकाणी आले आहेत. शनिवारी (दि.30) रोजी सकाळी मुंबई महापालिका, आझाद मैदान रस्त्यावर आंदोलक चहा, पोहे तयार करताना दिसले. बहुतांश सर्वच मराठा आंदोलकांनी घरून आणलेले साहित्य घेऊन रात्रीचे जेवण तयार केले.15 दिवस पुरेल इतके जेवणाचे साहित्य घेऊन आलो असल्याचे मराठा आंदोलकांनी यावेळी सांगितले.