

अहमदपूर : मराठा समाजास आरक्षण मिळावे या करीता मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी टाकळगाव ता.अहमदपूर येथील युवक विजय चंद्रकांत घोगरे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे २९ ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले असून त्यांना पाठींबा देण्यासाठी टाकळगाव ( कामखेडा) ता.अहमदपूर येथील मराठा बांधव दोन टेम्पो भाड्याने करून मुंबईला गेले होते.
दरम्यानच्या काळात आंदोलनात सहभागी असलेल्या विजय चंद्रकांत घोगरे या तीस वर्षीय युवकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुंबई येथील नामांकित दवाखान्यात दाखल करूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. विजय चंद्रकांत घोगरे यांचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत शिवाय त्यांना फक्त एकच मुलगा होता. विजय यांच्या निधनामुळे घरातील कर्ता पुरुष गमवावा लागला आहे.
शिवाय विजय हा विवाहित असून त्याला दोन लहान अपत्य आहेत. रविवारी त्याचे पार्थिव गावी येण्याची शक्यता असून या दुदैवी घटनेमुळे सबंध गावावर शोककळा पसरली आहे.