

Devendra Fadnavis mother controversy
जालना : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांच्या आईबद्दल केलेल्या कथित वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनी खुलासा केला आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले, "मी फडणवीसांच्या आईबद्दल काहीही बोललो नाही. जर माझ्याकडून बोलण्याच्या ओघात काही शब्द निघाले असतील आणि कुणाला ते आक्षेपार्ह वाटले असतील, तर मी मोठ्या मनाने ते शब्द मागे घेतो. आमच्या आई-बहिणींच्या वेदना मांडताना मी बोललो होतो. अंतरवली सराटीमध्ये आमच्या आई-बहिणींच्या डोक्याला मार लागला, रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, तेव्हा फडणवीस पोलिसांकडून बोलत होते. त्या वेळी आमच्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं," असा आरोप त्यांनी केला.
"फडणवीसांना मराठा समाजाला आरक्षण द्यायला जीवावर आलं आहे, म्हणून ते त्यांच्या आईला पुढे करत आहेत," असा थेट आरोप मनोज जरांगेंनी केला. "देवेंद्र फडणवीस रडके निघाले. मला वाटलं होतं की ते मर्दासारखे वागतील, पण ते आईच्या पदराआड लपतात," अशी टीका त्यांनी केली. "खेड्यात चालता बोलता शिव्या दिल्या जातात, पण आमच्या भावना वेगळ्या आहेत. आम्ही केवळ आमच्या हक्कासाठी लढतोय," असंही त्यांनी स्पष्ट केलं
"देवेंद्र फडणवीस, तुम्ही राजकारणासाठी आईचा बळी का देताय? अशा राजकारणाला लाथ मारली पाहिजे. आमच्या आई-बहिणींच्या वेदना, बलिदान यांची जाणीव ठेवून सरकारने तात्काळ आरक्षण द्यावं," अशी मागणी त्यांनी केली.
"मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या बांधवांवर दाखल गुन्हे मागे घ्या, त्यांच्या कुटुंबांना मदत करा," अशी मागणी करत त्यांनी सरकारवर आणि पोलिसांवरही टीका केली. "मार खाऊनही आमच्यावरच गुन्हे दाखल झाले, अजूनही केसेस मागे घेतल्या नाहीत," असा आरोप त्यांनी केला.