

वडीगोद्री: "मराठ्यांच्या नादी लागल्यास सरकार अडचणीत येईल," असा थेट इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. आमदार परिणय फुके यांच्या टीकेला उत्तर देताना, जरांगे यांनी सरकारवर जातीयवाद पसरवल्याचा गंभीर आरोप करत मुंबईत भव्य गणेश विसर्जन मिरवणुकीची घोषणा केली.
आपल्या चार दिवसीय दौऱ्यावर निघण्यापूर्वी अंकूशनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, "मराठा आणि ओबीसी समाजात वाद वाढवणे राज्याच्या प्रमुखांना शोभत नाही. मराठ्यांना कमी लेखू नका आणि माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका," असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
यावेळी जरांगे यांनी मराठा आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना मुंबईतील आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली. २७ ऑगस्ट रोजी मराठा समाज गणपती बाप्पासह मुंबईत भव्य मिरवणूक काढेल. "आमची मुंबई, आमचा समुद्र आणि आमची संस्कृती," यावर कुणाचेही बंधन चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत एकाही आंदोलकावर लाठीचार्ज झाल्यास मराठा समाज आणि सरकार आमनेसामने उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा संघर्ष अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले. "२९ ऑगस्टला आम्ही विजयाचा गुलाल उधळणार आणि आरक्षण मिळवणारच," असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या या घोषणेमुळे मराठा आरक्षणाच्या लढाईला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.