Manikrao Kokate
मुंबई : शेतकऱ्यांसंदर्भात विधान आणि सभागृहात रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ यामुळे अडचणीत सापडलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आता नव्या वादात सापडले आहेत. शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजनेची घोषणा केल्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांनी पीक विम्याबाबत बोलताना "पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून १ रुपया घेतं, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही," असे वादग्रस्त विधान केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे," अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून बाहेर काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषीमंत्री कोकाटे यांनी मंगळवारी एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. "कृषी समृद्धी योजना" असे नाव असलेल्या या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांत तब्बल २५,००० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेची घोषणा केल्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत कोकाटे यांनी पीक विम्याबाबतही वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "पिकविम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून १ रूपया घेत, याचा अर्थ सरकार भिकारी आहे शेतकरी नाही. मात्र, नेहमी अर्थ उलटा केला जातो. यामुळे १ रूपया किंमत फार थोडी आहे. यामुळे महाराष्ट्रात पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज सापडले. ते अर्ज तात्काळ बाद केले आणि नवीन घोषणा केली," असे कोकाटे म्हणाले.
कृषीमंत्री कोकाटे यांच्या या वक्तव्याबाबत गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे असे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "ते काय बोलले हे एकलं नाही, पण तसं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी अस वक्तव्य करणे चुकीच आहे. पीक विम्याच्या संदर्भात जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धत बदलली. काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी बहुतांश वर्षामध्ये कंपन्यांना फायदा जास्त झाला. त्यामुळे आपण त्याची पद्धत बदलली. त्यांचबरोबर ५ हजार कोटी रूपये दरवर्षी शेतीमध्ये गुंतवणूक करू. २५ हजार कोटी रूपयांची शेतीमधील गुंतवणूक वाढवत आहोत, असे असताना अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही," असे फडणवीस म्हणाले.