Mumbai News : पुन्हा जिवंत होण्याच्या आशेने चार वर्षांपासून जतन करून ठेवला मृतदेह

कुटुंबीयांचा ‘क्रायोनिक्स’चा प्लॅन; मालाडच्या क्लिनिकमध्ये ८० वर्षीय गृहस्थाचा मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले
human body preservation
human body preservationAI image
Published on: 
Updated on: 

मुंबई : भविष्यात विज्ञानाला ‘ संजीवनी तंत्र’ अवगत होईल आणि नैसर्गिकरित्‍या मृत्‍यू पावलेल्या आपले माणूस पुन्हा जिवंत होईल, या आशेने अमेरिकेसह अनेक देशांत क्रायोनिक्स तंत्राचा वापर करून मृतदेह वर्षानुवर्षे जतन केले जात आहेत. त्‍यासाठी या दिवंगतांची कुटुंबे लाखो रुपयांचा चुराडा करत आहेत. आजवर हे खुळ विदेशी बातम्यांमधून वाचनात आले ते आपल्या मुंबईतही कधीच पोहोचले आहे याची गंधवार्ता मात्र कालपर्यंत नव्हती. बुधवारी मालाडमध्ये एका बंद दवाखान्यातील फ्रिजरमध्ये चार वर्षांपासून जतन करून ठेवलेला वृध्दाचा मृतदेह पोलिसांना आढळला आणि सारेच चक्रावून गेले.

नेहमीप्रमाणे कुणीतरी खबर पोहोचवली आणि कुरार पोलिस मालाडमधील बंद पॉलिक्लीनिकमध्ये धडकले. तिथे फ्रिजरमध्ये वृध्दाचा मृतदेह आढळला. हा हत्‍येचा प्रकार असावा असे आधी पोलिसांनाही वाटले. मात्र कुटुंबियांनीच हा मृतदेह जतन करून ठेवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचेच कुतुहल चाळवले गेले.

८० वर्षीय वृध्दाचा मृत्‍यू २०२२ मध्ये कर्करोगाने झाला. त्यांच्यात पत्‍नी आणि दोन्ही मुलांचा इतका जीव गुंतलेला की, हा मृत्‍यू त्‍यांना काही स्वीकारता आला नाही. ऑनलाईनवर क्रायो प्रिझर्वेशन तथा क्रायोनिक्स तंत्राचा अंदाज त्‍याना आला. उणे १९६ सेल्सीअस तापमानात लिक्वीड नायट्रोजनचा वापर करून वर्षानुवर्षे जतन करून ठेवता येतो आणि भविष्यात मेलेला माणूस पुन्हा जिवंत करण्याचे तंत्र विज्ञानाने विकसित केले की, आपले गेलेले माणूसही पुन्हा जिवंत होवू शकेल या आशेने असे मृतदेह अनेक देशांत जतन केली जात आहेत, ही माहितीही त्‍यांना मिळाली.

human body preservation
Morbe Dam water storage : मोरबे धरणात ७३.९० टक्के पाणीसाठा

मृतदेह जसाचा तसा जतन करणार्‍या संस्थांची माहितीही मिळाली. मालाडच्या कुटुंबाने आधी या आजोबांचा मृतदेह साध्या फ्रिजरमध्ये ठेवला. पुढे त्‍यांच्या घराचा पुनर्विकास निघाल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मालाडच्या पॉलिक्लिनिकमध्ये त्‍यांनी हा फ्रिजर हलवला. हे क्लिनिक बंद होते आणि क्लिनिकच्या व्यवस्थापनाला किंवा जागेच्या मालकाला तिथे मृतदेह जतन करून ठेवल्याची कोणतीही कल्पना नव्हती.

पोलिस येताच कुटुंबाने या आजोबांचा आजारपणात मृत्‍यू झाल्याचे प्रमाणपत्र दाखवले. हा मृतदेह अमेरिकेला नेण्याचीही तयारी त्‍यांनी केली होती. आपले बाबा पुन्हा कधीतरी जिवंत होतील असे मुलांना वाटत होते. तिच आशा मुलांच्या आईलाही होती. या एका आशेपोटी या कुटुंबाने हा मृतदेह गेली चार वर्षे जतन करण्यासाठी तब्बल ५० लाख रुपये खर्च केल्याचे पोलिसांनी सांगितले.

human body preservation
Sahil Wakode Case: आयआयटीच्या प्रवेशद्वारावरील आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न?
  • पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

  • निसर्गतः मृत्‍यू झाल्यानंतर कुटुंबाने मृत्‍यू आपल्या अखत्‍यारित जतन करून ठेवला तर काय कारवाई करावी, असा प्रश्न पोलिसांसमाेर आहे. ते तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.

  • ८० वर्षीय आजाेबांचा मृतदेह फ्रिजरमध्येच आहे. तिथे पोलिस पहारा देत आहेत. आणि मृतदेहावर अंत्‍यविधी करावेत की, भविष्यातील पुनरूज्जीवनाला संधी म्हणून हा मृतदेह अमेरिकेला पाठवावा, या संभ्रमात हे कुटुंब अजूनही आहे.

  • या निमित्ताने अशा प्रकरणात भारतीय कायद्याच्या मर्यादाही समोर आल्या. निसर्गतः किंवा घातपाताशिवाय मृत्‍यू झाल्यास मृतदेह किती काळ जतन करून ठेवावा अशी कोणतीही कालमर्यादा सांगणारा कायदा भारतात नाही. काही काळासाठी, अत्‍यंविधीची तयारी करता यावी किंवा नातेवाईक येण्यास वेळ मिळावा तोपर्यंत शवागारात मृतदेह तात्‍पूरते ठेवता येतात. या पलिकडे भारतीय कायद्यात कोणतीही स्पष्टता नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news