मुंबई : सरकारी अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे प्रशासकीय कामकाजाचा बोऱ्या कसा उडतो, हे महाभूमिलेख विभागाच्या पोर्टलवरून समोर आले आहे. या पोर्टलवर बीड जिल्ह्यातील तालुके आणि अनेक गावांची इंग्रजीतून चुकीचे नावे देण्यात आली आहेत. जसे केज (Cage), मस्साजोग (Massage), लव्हुरी (Love) अशी चुकीची नावे पोर्टलवर झळकत आहेत. अशा नावांमुळे महसूल विभागाचे हसे होत आहे.
महाभूमिलेख हे पोर्टल जमीन अभिलेखांसंबंधी माहिती देणारी राज्य शासनाची महत्त्वाची ऑनलाईन प्रणाली आहे. सध्या या प्रणालीवर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील काही गावांची इंग्रजीतील नावांनी निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे.
पोर्टलवरील माहितीनुसार, केज तालुक्याचे नाव Cage, मस्साजोग गावाचे नाव Massage, तसेच आष्टीचे Eighty आणि वडवणीचे Vaddani असे इंग्रजीत रूपांतर झाले आहे. तर काही गावांची नावे Pumpkin, Come, Love, अशी दिल्याने ही गावे नेमकी कोणती आहेत, याची स्पष्टता येत नाही.
शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अशा हास्यास्पद चुका घडल्याने समाजमाध्यमांवर महसूल विभागाविरोधात खिल्ली उडवली जात आहे. दरम्यान, या चुकीच्या नावांबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ सुधारणा करून इंग्रजीतून योग्य नावे नोंदविण्याची मागणी केली जात आहे.