

मृणालिनी नानिवडेकर
मुंबई: नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता नेमा ही मागणी आक्रमकरीत्या समोर आली आहे. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात विरोधी पक्षनेतेपद मिळवा, असा दिल्लीचा आग्रह आहे.
अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यासाठी झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांनी उपस्थित केला.
‘लोकशाही उत्तम प्रकारे चालायची असेल, तर विरोधी पक्षनेता असणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे,’ असे पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला या बैठकीत सांगण्यात आले.
ठाकरे शिवसेनाही शर्यतीत
शिवसेना ‘उबाठा’नेही विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीसाठी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी काँग्रेसची भावना आहे. परिसीमन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यास वेगळे काही घडू शकेल, अशी धास्तीही विरोधकांच्या मनात आहे.
काँग्रेसपेक्षा शिवसेनेचे संख्याबळ जास्त
विधानसभा आणि विधान परिषदेत शिवसेना ‘उबाठा’च्या जागा काँग्रेसपेक्षा जास्त आहेत. संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ‘उबाठा’ला मिळेल. मात्र, तरीही या विषयाबाबत काँग्रेस पक्ष अधिक आक्रमक झाला आहे.
परिसीमन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आतून पाठिंबा देईल की बाहेरून, असे प्रश्न काँग्रेससमोर आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षनेतेपदाचा विषय अत्यंत आक्रमकपणे लावून धरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट परिसीमन विधेयकाला पाठिंबा देणार असला, तरी प्रत्यक्षात हा गट सत्ताधारी आघाडीचा भाग होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर ते काँग्रेस नेत्यांना सांगण्यातही आले आहे. ‘उबाठा’ला मात्र विरोधी पक्षनेतेपद मिळेल, याची खात्री वाटत नाही.
शिंदेंना घेरण्याची ठाकरेंची रणनीती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हिवाळी अधिवेशनात हल्ला करण्याची रणनीती ‘उबाठा’ने निश्चित केली आहे.
काँग्रेसचा दबाव
काँग्रेसचा डोळा विरोधी पक्षनेतेपदावर आहे. राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने काँग्रेसला आता देशभरात मानाचे स्थान मिळत असल्याकडेही केंद्रातील नेत्यांनी महाराष्ट्र कार्यकारिणीचे लक्ष वेधले आहे.
काँग्रेसने आग्रह सोडावा; शिवसेनेची भूमिका
शिवसेना ‘उबाठा’चे नेते भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेता होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसला वाटते. मात्र, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना लोकलेखा समिती या महत्त्वाच्या समितीचे प्रमुखपद मिळाले आहे, त्यामुळे आता काँग्रेसने हा आग्रह सोडावा आणि आम्हाला पाठिंबा द्यावा, अशाही हालचाली ‘उबाठा’च्या वतीने सुरू झाल्या होत्या.
‘ऑपरेशन टायगर थ्री’ चर्चेत
या पार्श्वभूमीवरच ‘ऑपरेशन टायगर थ्री’ची चर्चा प्रचंड वेगाने सुरू झाली असल्याने हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपद पदरी पाडून घेतले तर जनतेत मानाने जाता येईल, असा बहुतांश आमदारांचा आग्रह आहे.
विधिमंडळ सचिवालयाच्या कार्यकक्षेत विरोधी पक्ष नेतेपदाचा विषय येत असल्याने विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.
विधानसभेत ठाकरेंचे २०, काँग्रेसचे १६, तर पवारांचे १० आमदार
विधानसभेत शिवसेना ‘उबाठा’चे २० काँग्रेसचे १६, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १०, सीपीआयएम आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येकी एक असे ३८ आमदार आहेत.
या संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतापद देता येणार नाही, असे सरकारतर्फे तोंडी सांगण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भातील आधीचे पुरावे लक्षात घेत सदस्यसंख्या कमी असली तरी विरोधी पक्षनेतेपद देता येते, याकडे लक्ष वेधले गेले आहे.
परिषदेत ठाकरेंचे ५, काँग्रेसचे ४, तर पवारांचे ३
विधान परिषदेत काँग्रेसचे ४, शिवसेना ‘उबाठा’चे ५ तर एनसीपी शरद पवार गटाचे ३ सदस्य आहेत. १२ सदस्यांच्या जोरावर परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळेल का, याबद्दलही शंका व्यक्त केली जाते आहे.
मात्र, लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही काम करतो, अशी भाषा सातत्याने भाजप नेते वापरत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदीय परंपरांचा आदर राखत विरोधी पक्षनेता नेमावा, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत.