Traffic Challan Discount: थकीत वाहतूक चलनावर २० टक्के सवलत; १ डिसेंबरपासून अभय योजना लागू

महाराष्ट्रात तीन टप्प्यांत योजना; पात्र ई-चलनांचा दंड भरण्यासाठी वाहनधारकांना मिळणार मुदत
Traffic Challan Discount
Traffic Challan DiscountPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनांवर आकारण्यात आलेल्या आणि अद्याप वसूल न झालेल्या ई-चलनांच्या दंडाच्या रकमेत २० टक्के सवलत देण्यासाठी ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ येत्या १ डिसेंबरपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लागू होत आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या ४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली होती. ही योजना तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जारी झालेल्या आणि १ डिसेंबर रोजी वसुलीसाठी प्रलंबित असलेल्या पात्र ई-चलनांच्या एकूण थकीत तडजोड शुल्कावर २० टक्के सवलत मिळणार आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वाहनचालक किंवा मालकांना योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम शासनाच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.

Traffic Challan Discount
Bhoodan Land Case: ठाणे, रायगडमधील भूदान जमिनी बळकावल्याच्या चौकशीसाठी एसआयटी

दुसऱ्या टप्प्यात १ डिसेंबर २०२६ पासून पुढे जारी होणाऱ्या पात्र ई-चलनांवर लवकर भरणा सवलत अर्थात अर्ली बर्ड स्कीम लागू राहणार आहे. या टप्प्यातही दंडाच्या थकीत तडजोड शुल्कावर २० टक्के सवलत मिळेल.

मात्र, संबंधित चलन कायदेशीररीत्या बजावल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत दंडाचा भरणा करणे आवश्यक आहे. ही सवलत १ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२७ या एक वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

Traffic Challan Discount
Mumbai Tree Cutting : मुंबईकर ५० वर्षे जुनी ३४२ झाडे गमावणार

तिसऱ्या टप्प्यात न्यायालयात प्रलंबित असलेल्या चलनांचा समावेश करण्यात आला आहे. ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत जारी झालेली आणि योजना सुरू होण्याच्या दिवशी सक्षम न्यायालयात किंवा आभासी न्यायालयात प्रलंबित असलेल्या पात्र चलनांच्या थकीत तडजोड शुल्कावर २० टक्के सवलत दिली जाणार आहे. सवलतीनंतरची रक्कम योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत भरावी लागणार आहे.

ऑनलाईन किंवा वाहतूक विभागात भरणा

पात्र चलनांची रक्कम वाहतूक पोलिसांच्या अधिकृत चलन पोर्टलवर ऑनलाईन किंवा जवळच्या वाहतूक पोलीस विभागात रोखीने भरता येणार आहे. भरणा झाल्यानंतर संबंधित चलनासमोर तडजोडीची नोंद करून वाहनधारकाला पावती दिली जाणार आहे.

न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित आरोपीच्या स्वेच्छेच्या संमतीने आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच तडजोडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

सर्वच चलनांना सवलत नाही

या योजनेचा लाभ घेताना काही महत्त्वाच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. केवळ मोटार वाहन कायद्याच्या कलम २०० अंतर्गत तडजोड करण्यास पात्र असलेल्या गुन्ह्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिवहन विभागाने किंवा त्यांच्या अंमलबजावणी प्रणालीमार्फत जारी केलेली चलने या योजनेच्या कक्षेत येणार नाहीत.

तसेच, एका चलनामध्ये तडजोडपात्र आणि तडजोड न करता येणारे असे दोन्ही प्रकारचे गुन्हे नोंदवले असतील, तर संपूर्ण चलन सवलतीसाठी अपात्र ठरणार आहे. मात्र, एका चलनातील सर्व गुन्हे तडजोडपात्र असल्यास संबंधित व्यक्तीच्या स्वेच्छेच्या संमतीने त्यांची एकत्रित तडजोड करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.