

मुंबई: आज स्वातंत्र्यदिनी (दि.१५) राज्यातील बुलढाणा, धुळे, सोलापूर, इंदापूर, वर्धा आणि मंत्रालयासमोर अशा सहा ठिकाणी नागरिकांनी संतापाच्या भरात टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. जमिनीचे वाद, अन्याय, थकीत देयके आणि न्याय मिळविण्याच्या मागण्या यामुळे हे प्रकार घडले. मात्र सतर्क पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत अनर्थ टाळला. या घटनांनी प्रशासनावरील जनतेचा रोष आणि तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष अधोरेखित झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या आंधरुड येथील शेवंताबाई बनसोडे या महिलेने ध्वजारोहणापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला, गावातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करण्याची या महिलेची मागणी होती.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिजामाता कन्या छात्रालयातील मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी महिलेने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रशासन व मंत्र्यांनी आपल्या मुलीला न्याय द्यावा व दोषींवर कारवाई करण्याची मागणी या महिलेने केली, दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला आहे.
सोलापूरात स्वांतत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणाने आत्मदहनाचा केला प्रयत्न केला. गौरव पवार असे या तरुणाचे नाव असून, तो सोलापूर शहरातील विणकर सोसायटी येथील रहिवाशी आहे. अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटून घेत, आत्मदहनाचा प्रयत्न करत असलेल्या तरुणाला सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आत्मदहनाचे कारण अद्याप समजले नसून तरुणाला ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
इंदापुरात जमिनीच्या वादावरून स्वातंत्र्यदिनी युवतीने आत्मदानाचा प्रयत्न केला. इंदापूरमधील प्रशासकीय भवनाच्या आवारातच ध्वजावंदन सुरू असताना पूजा शिंदे नावाच्या युवतीने अंगावरती पेट्रोलसदृश्य पदार्थ ओतून घेत आत्मदानाचा प्रयत्न केला. यादरम्यान इंदापूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. गेल्या दोन दिवसापासून जमिनीच्या वादाच्या प्रकरणावरून पूजा शिंदे या युवतीने आपल्या कुटुंबावर अन्याय होत असून, धनदांडगे ही जमीन लुटत आहेत असा आरोप केला होता आणि स्वातंत्र्यदिनी आपण आत्मदहन करू असा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यानंतर आज इंदापूर मधील प्रशासकीय भवनांच्या परिसरात तिने ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वर्ध्यात कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपयांचे देयक थकले असून, वारंवार निवेदन देऊनही कार्यकारी अभियंता अंभोरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे संतप्त कंत्राटदार बाबा जाकीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आत्महदहनाचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखले. पीएम विश्वकर्मा योजनेसह शासनाकडून करण्यात आलेल्या कामांचा निधी जिल्ह्याला मिळाल्यानंतरही बिल काढण्यासाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप आहे. शासन व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदार आता टोकाची पावले उचलत आहेत.