PM Narendra Modi: तरुणांसाठी रोजगार योजना, GST फेररचना ते चीनवर निशाणा; मोदींच्या भाषणातील २० प्रमुख मुद्दे

Independence Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावरून गेल्या 12 वर्षांतले सर्वात मोठं भाषणं करत २०४७ पर्यंत विकसित भारताचा रोडमॅपच सादर केला.
PM Narendra Modi
PM Narendra Modipudhari photo
Published on
Updated on

Independence Day 2025 PM Narendra Modi speech

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावरून गेल्या १२ वर्षातलं सर्वात मोठं भाषणं करत २०४७ पर्यंत विकसित भारताचा रोडमॅपच सादर केला. पाकिस्तान, चीन या शेजारी राष्ट्रांना खडेबोल सुनावतानाच मोदींनी तरुणांसाठी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना, सर्वसामान्यांना दिलासा देणारी जीएसटीमधील फेररचना, ऑपरेशन सुदर्शन चक्र, अशा विविध घोषणांचा पाऊसही पाडला. मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे काय आहेत, हे जाणून घेऊया..

१. अण्वस्त्र हल्ल्यांना भीक घालत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडची शिक्षा दिली. पाकिस्तानमधील विध्वंस इतका मोठा आहे की दररोज नवीन खुलासे होत आहेत. आपला देश अनेक दशकांपासून दहशतवाद सहन करत आहे. आता दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना वेगळे मानणार नाही. ते मानवतेचे समान शत्रू आहेत. भारत अण्वस्त्र हल्ल्यांना भीक घालत नाही, यापुढे कोणत्याही धमक्या सहन करणार नाही," अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला ठणकावले.

२. सिंधू नदी करार एकतर्फी

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने ठरवले आहे की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू नये. भारतीय नद्यांचे पाणी शत्रूंना मिळत आहे. मात्र, आता भारताला आपल्या वाट्याचे पाणी मिळेल. भारतातील शेतकऱ्यांचा त्यावर हक्क आहे. सिंधू करार एकतर्फी आणि अन्याय्यी होता. हा करार राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने स्वीकारार्ह नसल्याचे मोदी म्हणाले.

३. भारत सेमीकंडक्टर आणि ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होणार

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "सेमीकंडक्टर उत्पादन कारखाना उभारण्याची योजना ५०-६० वर्षांपूर्वी आली होती, पण त्या फायली अडकल्या, लटकल्या आणि भरकटल्या. ५० वर्षांपूर्वी सेमीकंडक्टरची फाईल पुरली गेली. पण आता मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येतील. सहा युनिट्स बांधण्यात आली आहेत आणि आणखी चार सेमीकंडक्टर योजनांना हिरवा कंदील दाखवला आहे. या वर्षाच्या अखेरीस, भारतात बनवलेल्या आणि भारतातील लोकांनी बनवलेल्या सेमीकंडक्टर चिप्स बाजारात येतील."

४. १० नवीन अणुभट्ट्या बांधण्याचे काम सुरू

'१० नवीन अणुभट्ट्या बांधण्याचे काम सुरू आहे', असे पंतप्रधान मोदी म्हणाले. "आपण अणुऊर्जेच्या क्षेत्रात विकास करत आहोत. १० नवीन अणुभट्ट्या बांधण्याचे काम सुरू आहे. आपण अणुऊर्जेची क्षमता १० पट वाढवू. या क्षेत्रात खासगी क्षेत्रासाठी मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले.

५. २०३० पर्यंत स्वच्छ ऊर्जेचा वापर ५० टक्क्यांपर्यंत वाढवू

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जग जागतिक तापमानवाढीबद्दल चिंतेत आहे. आपण २०३० पर्यंत स्वच्छ ऊर्जेचा वापर ५० टक्क्यांपर्यंत वाढवू असे लक्ष्य ठेवले होते. २०३० साठी जे ५० टक्के स्वच्छ ऊर्जेचे लक्ष्य ठेवले होते ते २०२५ मध्येच साध्य केले. आपण निसर्गाप्रती तितकेच जबाबदार आहोत. बजेटचा मोठा भाग पेट्रोल आणि डिझेल आणण्यासाठी खर्च केला जातो. जर आपण ऊर्जेवर अवलंबून नसतो, तर तो पैसा आपल्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरला असता. आता आपण देशाला विकसित करण्यासाठी वेगळे प्रयत्न करत आहोत."

६. देशाची आता समुद्र मंथनकडे वाटचाल

काही देश तंत्रज्ञानामुळे शिखरावर पोहोचले आहेत. आपण समुद्र मंथनकडे आता वाटचाल करत आहोत. समुद्रात वायू आणि तेलाचे साठे लपलेले आहेत. आपण ऑपरेशन गगनयानची तयारी करत आहोत. अंतराळ क्षेत्रात काम वेगाने सुरू आहे. आपण अंतराळात आपले स्वतःचे अंतराळ केंद्र बांधूणार असल्याचे मोदी म्हणाले.

७. RSS ने १०० वर्षे मातृभूमीच्या कल्याणासाठी दिली

पंतप्रधान मोदी म्हणाले की, १०० वर्षांपूर्वी एक संघटना जन्माला आली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. १०० वर्षे देशाची सेवा करत आहे. वैयक्तिक विकासाद्वारे राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाने, संघाच्या लोकांनी भारत मातेच्या कल्याणाच्या ध्येयाने १०० वर्षे मातृभूमीच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. आरएसएस ही जगातील सर्वात मोठी एनजीओ आहे. १०० वर्षांपासून देशाच्या प्रवासात तिने महत्त्वाचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

८. स्वावलंबनात भारत सर्वोत्तम

"स्वावलंबी होण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम असले पाहिजे. ही काळाची गरज आहे. देशातील सर्व इंधन उत्पादकांनी लक्षात ठेवा भारत आपल्या सर्वांचा आहे. एकत्रितपणे आपल्याला व्होकल फॉर लोकल हा मंत्र प्रत्यक्षात आणायचा आहे. येणारा युग ईव्हीचा आहे. आपल्याला उत्पादन खर्च देखील कमी करावा लागेल," असेही मोदी म्हणाले.

९. स्वदेशी ही मजबूरी नाही तर मजबूती

"देशातील व्यापाऱ्यांनी 'इथे स्वदेशी माल विकला जातो', असे बोर्ड लावले पाहिजेत. स्वदेशी ही मजबूरी नाही तर मजबूती असली पाहिजे. मला मोठा काळ सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मला व्यवस्थेच्या मर्यादा माहीत आहेत. संसदेत आम्ही लोकांच्या गरजेसाठी बदल करत आहोत. नागरीकांचं जीवन सोप बनवण्यासाठी काम केलं. नव्या आयकरात बदल केला. १२ लाखापर्यंत कमाई करणाऱ्या आयकरातून मुक्ती दिली. आम्ही दंडसंहिता संपवली आणि न्याय संहिता आणली.

10. दिवाळीत देशवासीयांना मोठी भेट

दिवाळीत देशवासीयांना मोठी भेट मिळणार आहे. जीएसटीमध्ये सुधारणा केली जाणार असून यामुळे सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू स्वस्त होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अर्थक्षेत्रातील हा ऐतिहासिक निर्णय असेल, असंही मोदींनी सांगितले. आठ वर्षांपूर्वी वस्तू आणि सेवा कर आणला होता, आता त्याचा फेरआढावा घेणार असल्याची घोषणी त्यांनी केली.

११. आजपासून विकासित भारत रोजगार योजना लागू

पंतप्रधान मोदींनी विकासित भारत रोजगार योजनेची घोषणा केली. ते म्हणाले की, "देशातील तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. आज, १५ ऑगस्ट रोजी देशातील तरुणांसाठी १ लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहे. आजपासून, पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना लागू करण्यात आली आहे. खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या मुला-मुलींना सरकारकडून १५ हजार रुपये दिले जातील. यामुळे ३.५ कोटी तरुणांना रोजगार मिळेल."

12. 2 कोटी महिला लखपती दीदी बनल्या

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारतातील महिलांच्या शक्तीची सर्वजण कबुली देत आहेत. वाढत्या अर्थव्यवस्थेत महिलांचे मोठे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रापासून ते स्टार्टअप्सपर्यंत, आपल्या मुली वर्चस्व गाजवत आहेत. आज देशाच्या विकास प्रवासात महिला खांद्याला खांदा लावून योगदान देत आहेत. नमो ड्रोन दीदी ही महिला शक्तीमध्ये एक नवीन ओळख बनली आहे. आपण तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला होता, आज मला समाधान आहे की आपण वेळेपूर्वी तीन कोटींचे लक्ष्य पार करू. काही वेळातच २ कोटी महिला लखपती दीदी बनल्या असल्याचे मोदींनी सांगितले.

१३. 'शेतकरी, मच्छीमार आणि कामगारांच्या हितासाठी मोदी भिंत उभी आहे'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, "शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ मिळत आहे. चांगली आणि प्रगत खते, पाणी, बियाणे उपलब्ध आहेत. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे आणि भाजीपाला उत्पादक आहे. मोदी भिंत शेतकरी, मच्छीमार आणि कष्टकरी नागरिकांच्या हितासाठी आहे. आम्ही लोकांचा आत्मविश्वास जागृत केला आहे. आयुष्मान भारत योजनेने आपल्याला निरोगी जीवन जगणे शिकवले आहे."

14. महात्मा फुलेंचे मंत्र आमच्यासाठी प्रेरणादायी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती लवकरच येत आहे. आम्ही त्यांच्या जयंतीचे उत्सव सुरू करणार आहोत. त्यांनी दिलेले मंत्र आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. मागासांना प्राधान्य याद्वारे, आम्हाला बदल घडवून आणायचा आहे. आम्हाला प्रत्येक मागासलेल्या व्यक्तीच्या जीवनात बदल घडवायचा असल्याचे मोदी म्हणाले.

15. खेलो भारत अंतर्गत क्रिडाधोरण राबवणार

खेळासाठी एक इकोसिस्टीम तयार करत असून खेलो भारत अंतर्गत क्रिडाधोरण राबवणार असल्याचे मोदींनी सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा मुले खेळात उत्कृष्ट कामगिरी करतात तेव्हा पालकांना अभिमान वाटतो. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही राष्ट्रीय क्रीडा धोरण आणले आहे. आम्हाला शाळेपासून महाविद्यालयापर्यंत संपूर्ण परिसंस्था विकसित करायची आहे, जेणेकरून खेळांशी संबंधित सर्व प्रकारची संसाधने उपलब्ध होतील."

16. सुदर्शन चक्र अभियान सुरू करणार

सुरक्षेसाठी देशात 'सुदर्शन चक्र अभियान' सुरू करण्यात येणार आहे. हे सुदर्शन चक्र एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, जी केवळ शत्रूचा हल्लाच नष्ट करणार नाही तर शत्रूवर अनेक पटींनी प्रहार करेल. मोदी म्हणाले की, "पुढील दहा वर्षांत आपण सुदर्शन चक्र अभियानाला जोमाने पुढे नेऊ. या अंतर्गत, २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वाची ठिकाणे या राष्ट्रीय सुरक्षा कवचाने व्यापली जातील. हे सुरक्षा कवच विस्तारत राहील. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटले पाहिजे. यासाठी, २०३५ पर्यंत या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार करायचा आहे, म्हणून श्रीकृष्णापासून प्रेरणा घेऊन, आपण सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे."

17. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला

आपल्याला सर्व भाषेवर गर्व असायला पाहिजे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. आपला देश भाषांच्या विविधतेतून भरला आहे. मराठी, आसामी, पाली, बांगला यांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे मोदींनी नमूद केलं.

18. २०४७ हे वर्ष दूर नाही, प्रत्येक क्षण मौल्यवान

"२०४७ हे वर्ष दूर नाही, प्रत्येक क्षण मौल्यवान आहे आणि आपण एक क्षणही गमावू इच्छित नाही. ही पुढे जाण्याची संधी आहे. मोठे स्वप्न पाहण्याची संधी आहे. विकसीत भारताच्या संकल्पाला समर्पित राहण्याची संधी आहे आणि जेव्हा सरकार आणि मी स्वतः तुमच्यासोबत असतो तेव्हा आपण नवीन इतिहास घडवू शकतो," असे मोदी म्हणाले.

19. 'हाय-पॉवर डेमोग्राफी मिशन'ची घोषणा

"मी देशाला एका चिंतेबद्दल, एका आव्हानाबद्दल सावध करू इच्छितो. एका विचारपूर्वक केलेल्या षड्यंत्राअंतर्गत, देशाची लोकसंख्या बदलली जात आहे, एका नवीन संकटाची बीजे पेरली जात आहेत. घुसखोर माझ्या देशातील तरुणांचे जीवनमान हिरावून घेत आहेत. घुसखोर माझ्या देशातील बहिणी आणि मुलींना लक्ष्य करत आहेत. घुसखोरीमुळे लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकार उच्च-शक्तीशाली लोकसंख्याशास्त्रीय मिशन स्थापन करणार आहे. भारत घुसखोरांना आदिवासींच्या जमिनी बळकावू देणार नाही," असे पंतप्रधान मोदींनी बेकायदेशीर स्थलांतरितांचा उल्लेख करत म्हटले.

20. लठ्ठपणा देशासाठी मोठी समस्या

मोदी म्हणाले की, "आपल्या देशातील लोकांनी काळजी घेतली पाहिजे की लठ्ठपणा ही देशासाठी एक मोठी समस्या बनत आहे. प्रत्येक घरात एक व्यक्ती लठ्ठ आहे. आपल्याला हा लठ्ठपणा टाळावा लागेल. कुटुंबाने ठरवावे की जेव्हा स्वयंपाकाचे तेल घरी येईल तेव्हा ते १०% कमी असेल आणि आपण लठ्ठपणाविरुद्धची लढाई जिंकण्यात योगदान देऊ."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news