

मुंबई : आदिती कदम
राज्यात सिकल सेलविरोधी मोहिमेचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात सुरू असताना तब्बल 70.63 लाख चाचण्यांमध्ये 81,804 वाहक आणि 8,281 रुग्ण आढळल्याने सिकल सेल ॲनिमियाची समस्या गंभीर रुप धारण करत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
2020-21 मध्ये केवळ 344 रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, तपासण्या वाढत गेल्यानंतर 2024-25 मध्ये हा आकडा 2,762 वर पोहोचला. जानेवारी 2026 पर्यंत 1,943 नवीन रुग्ण आढळले असून, ही किंचित घट असली तरी एकूण परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.
राज्य सरकार ‘अरुणोदय अभियान’ अंतर्गत सिकल सेल निर्मूलनाचे दावे करत असले तरी हीच आकडेवारी सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. 2025-26 मध्ये 74.59 लाख तपासण्यांत 1,943 नवीन रुग्ण आणि 34,159 वाहक आढळले, तर सध्या राज्यात नवीन-जुने मिळून 22,891 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सिकलसेल म्हणजे काय?
सिकलसेल हा रक्ताशी संबंधित एक अनुवांशिक आजार आहे, जो पालकांकडून मुलांमध्ये संक्रमित होतो. यामध्ये शरीरातील लाल रक्तपेशींचा आकार सामान्य गोलाकार ऐवजी विळ्यासारखा होतो आणि त्या कडक बनतात. या बदललेल्या आकारामुळे पेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडकून रक्तप्रवाह खंडित करतात, ज्यामुळे शरीरात तीव्र वेदना आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते.
सिकलसेल रुग्ण आणि वाहक यातील मुख्य फरक जनुकीय रचना व आजाराच्या लक्षणांवर आधारित आहे. रुग्णाला तीव्र वेदना व त्रास होतो, तर वाहकाला सहसा कोणतीही लक्षणे नसतात, परंतु ते आजाराचे जनुक पुढच्या पिढीत संक्रमित करू शकतात.
डिजिटल देखरेख, एचपीएलसी चाचणी व रंग-संकेतित कार्ड प्रणाली यांचा यशस्वी दावा केला जात असला तरी, वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून 1,23,902 लोकांनी विवाहपूर्व समुपदेशन घेतले, तर 13,150 महिलांना विवाहानंतर समुपदेशन करावे लागले.
नंदुरबार,गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यांत रुग्णसंख्या जास्त असल्याने आरोग्य व्यवस्थेचे वास्तव उघड.