अर्थवार्ता : म्युच्युअल फंडात पैशांचा पाऊस! मार्चमध्ये ४०,४५० कोटींची गुंतवणूक

Nifty Sensex
अर्थवार्ता : म्युच्युअल फंडात पैशांचा पाऊस! मार्चमध्ये ४०,४५० कोटींची गुंतवणूकPudhari File Photo
Published on
Updated on

* शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी गेल्या आठवड्यात मोठी उसळी घेत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 29 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसई सेन्सेक्समध्ये आठवड्याभरात 4,230.70 अंकांची वाढ होत तो 77,550.25 वर पोहोचला, तर निफ्टीमध्ये 1,337.50 अंकांची उसळी नोंदवत तो 24,050.60 वर बंद झाला. सेन्सेक्सने 5.77 टक्के तर निफ्टीने 5.89 टक्के साप्ताहिक वाढ नोंदवली, जी मागील पाच वर्षांतील सर्वोच्च कामगिरी ठरली. या तेजीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती एकूण 28.86 लाख कोटी रुपयांनी वाढून बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एका दिवसातच सुमारे 18,234.16 कोटी रुपयांची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आठवडाभरात 21,602.32 कोटी रुपयांची खरेदी केली. जागतिक तणाव कमी होण्याच्या अपेक्षेमुळे बाजारात ही जोरदार तेजी दिसून आली.

* आरबीआयच्या गैर बँकिंग वित्तपुरवठा करणार्‍या संस्थांबद्दलच्या (NBFC UPPER LAYER) नव्या नियमामुळे टाटा सन्सच्या आयपीओबाबत अनिश्चितता कायम आहे. नव्या प्रस्तावानुसार रु. 1 लाख कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या एनबीएफसींना अप्पर लेयरमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. टाटा सन्सची एकूण मालमत्ता सुमारे रु. 1.75 लाख कोटी असल्याने कंपनी या निकषात बसते. त्यामुळे आयपीओ काढणे आवश्यक ठरण्याची शक्यता असून, नियामक स्पष्टतेअभावी निर्णय लांबला आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी नवीन फ्रेमवर्क सूचवण्यात आले आहे.

* मार्च महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये रु. 40,450 कोटींची गुंतवणूक होऊन 8 महिन्यांतील उच्चांक नोंदवला गेला. एसआयपीद्वारे रु. 32,087 कोटींची भर पडली, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असून, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे दिसते. स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप योजनांमध्ये अनुक्रमे रु. 6,264 कोटी आणि रू. 6,064 कोटींची गुंतवणूक झाली. एकूणच इक्विटी बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीचा कल मजबूत होत आहे.

* आर्थिक वर्ष 2026 मध्ये 32.08 दशलक्ष नवीन डिमॅट खाती उघडली गेली, ज्यामुळे एकूण संख्या 224.51 दशलक्ष झाली. मात्र, ही वाढ मागील तीन वर्षांतील सर्वात कमी ठरली. 2025 मध्ये 41.06 दशलक्ष आणि 2024 मध्ये 36.91 दशलक्ष वाढ नोंदली होती. सीडीएसएलने 27.14 दशलक्ष तर एनएसडीएलने 4.94 दशलक्ष खाती वाढवली. आयपीओमार्फत रु. 1.79 लाख कोटी उभारणी होऊनही खात्यांच्या वाढीचा वेग मंदावला आहे.

* टीसीएसने मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात 28.7% वाढ नोंदवत रु. 13,738 कोटींचा नफा कमावला. मागील तिमाहीत हा नफा रु. 10,657 कोटी होता. कंपनीचा महसूल रु. 70,698 कोटींवर पोहोचला, जो आधी रु. 67,087 कोटी होता. एबिटडा रु. 19,276 कोटी तर मार्जिन सुमारे 19.4% राहिले. कंपनीने सुमारे 12 अब्ज डॉलर्स किमतीचे डील्स जिंकले आहेत.

* टीसीएसकडून टाटा सन्सला मिळणारा लाभांश आर्थिक वर्ष 2026 मध्ये 12% घटून रु. 28,388 कोटी झाला. मागील वर्षी हा लाभांश रु. 32,256 कोटी होता. प्रति शेअर लाभांश 126 वरून 110 वर आला. टाटा सन्सचा टीसीएसमधील हिस्सा 71.74% असून, घटलेला लाभांश कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम करणारा ठरला. शेअर किमतीतील चढ-उताराचा त्यावर परिणाम झाला.

* आरबीआयने रेपो दर 5.25% वर कायम ठेवत धोरणात्मक भूमिका ‘न्यूट्रल’ ठेवली आहे. महागाई दर 4.4% ते 4.6% दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2027 साठी जीडीपी वाढ 6.9% राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एमपीसीच्या सर्व 6 सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा सावध निर्णय मानला जातो.

* केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी नॉन-युरिया खत अनुदान रु. 41,533 कोटी मंजूर केले आहे. हे मागील वर्षाच्या तुलनेत 11% म्हणजे रु. 4,317 कोटींनी जास्त आहे. एकूण खत अनुदान बजेट रु. 1.7 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. खतांच्या किमती स्थिर ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

* केंद्र सरकार रु. 2.5 लाख कोटींची कर्ज हमी योजना आणण्याच्या तयारीत आहे. या योजनेत कर्जाच्या 90% पर्यंत हमी देण्यात येणार असून, मर्यादा रु. 100 कोटी प्रति कर्ज असेल. यासोबत सुमारे रु. 14,000 कोटींचा पुनर्विमा निधीही प्रस्तावित आहे. एमएसएमई क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेमुळे युद्धामुळे प्रभावित उद्योगांना आधार मिळण्याची अपेक्षा आहे.

* 3 एप्रिल 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय गंगाजळीमध्ये 9 अब्ज डॉलरची वाढ होऊन ती 697.12 अब्ज डॉलरवर पोहोचली. परकीय चलन साठ्यातील ही वाढ प्रामुख्याने विदेशी चलन मालमत्तांमधील वाढीमुळे झाली. तसेच सोन्याच्या साठ्यातील बदलाचाही काही प्रमाणात प्रभाव दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news