

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा 20 वरून 40 तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्चातही वाढ करण्याबाबत आयोग निर्णय घेईल, अशी ग्वाही राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत मंगळवारी आयोगाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे, नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असे स्पष्टीकरणही वाघमारे यांनी दिले.
ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यासाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला जातो. त्यानुसार 1 जुलै 2025 या अधिसूचित दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्यांबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात.
10 डिसेंबरपर्यंत मतदार याद्या
दरम्यान, राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे सचिव काकाणी यांनी मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार 10 डिसेंबरपर्यंत मतदान केेंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
14 ऑक्टोबर 2025 : 1 जुलै 2025 ला अस्तित्वातअसलेल्या विधानसभेच्या याद्या आयोगाच्या वेबसाईटवरू डाऊनलोड केल्या जातील.
6 नोव्हेंबर 2025 : विधानसभा मतदारयादीवरून महापालिकांसाठी तयार प्रारूप मतदार यादी हरकतींसाठी प्रसिद्ध केल्या जातील.
14 नोव्हेंबर 2025 : प्रारूप मतदार याद्यांवर हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत
28 नोव्हेंबर 2025 : हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
4 डिसेेंबर 2025 : मतदान केंद्रांच्या ठिकाणांची याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
10 डिसेंबर 2025 : मतदान केेंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.