

मुंबई: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाच्या सरींना पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. या हवामान बदलामुळे राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता असून, पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
नवीन अंदाजानुसार, आज सोमवारपासून (दि.२० जुलै) शनिवारपर्यंतच्या या सहा दिवसांच्या काळात राज्यभरात बहुतांश ठिकाणी बऱ्यापैकी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत बुधवार आणि गुरुवार मध्यम पावसाचा अंदाज असून, या दोन दिवसांत राज्यभरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल.
तसेच विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरित दिवसांत विविध ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, एकूणच आजपासून पुढील आठवडाभर पावसाचा जोर वाढलेला दिसेल.