

मुंबई: राज्यातील वीजनिर्मिती आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी ‘एआय’चा वापर करून व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.
फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे उन्हाळ्याच्या काळातील ‘पीक डिमांड’संदर्भात वीज वितरण आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी वीज व्यवस्थापनासाठी तसेच देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करण्याचे निर्देश दिले.
उन्हाळा आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा व संबंधित यंत्रणांनी वीजनिर्मिती आणि वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात, असेही मुख्यमंत्री म्हणाले. रूफटॉप सौरऊर्जेमुळे फायदा होत आहे. वीजनिर्मितीसाठी पुरेशी कोळसा आणि पाण्याची उपलब्धता आहे.
आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच टाटा पॉवर, अदानी पॉवर आणि ‘बेस्ट’ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोयना जलविद्युत प्रकल्प
गरजेनुसार 1,800 मेगावॅटपर्यंत पूर्ण क्षमतेने वापर. आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त वीज खरेदी
भिरा पंप्ड स्टोरेज कार्यरत
सर्व ब्लॅक स्टार्ट ड्रिल्स यशस्वीरीत्या पूर्ण
राज्य लोड डिस्पॅच केंद्राच्या बॅकअप कंट्रोल ड्रिल पूर्ण ज्यामुळे मुख्य नियंत्रण केंद्रात अडचण आल्यास कामकाज सुरळीत चालू राहू शकते.