

Ajit Pawar Dies In Plane Crash In Baramati: आज बुधवारी सकाळी बारामतीत एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली. अजित पवार यांना घेऊन येणाऱ्या खासगी विमानाचा बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, अजित पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या चार प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ते मुंबईहून सकाळी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेत असतानाच तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासाअंतीच स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, वैद्यकीय पथके आणि मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला. आग विझवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. विमानाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, विमान वाहतूक व तांत्रिक तपास पथक अपघातस्थळी दाखल झाले असून रनवेची स्थिती, हवामान, आणि विमानातील तांत्रिक प्रणालींची तपासणी सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
(पुढारी इनपुट)