

मुंबई : राज्यातील महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून जाहीर केली आहेत. यानुसार या निवडणुकीत नव्याने आरक्षण काढण्यात येणार असून पुढील निवडणुकीपासून चक्रानुक्रमे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे पुन्हा नगरसेवक बनू पाहणाऱ्या माजी नगरसेवकांचे टेन्शन वाढले आहे.
शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांच्या सहीने 9 ऑक्टोबरला अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग आरक्षण होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अधिसूचनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय नागरिक आणि महिलांसाठी नगरसेवकांच्या जागांचे आरक्षण व फेरफार कशा पद्धतीने करायचे, याबाबतची स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.
असे लागू होणार आरक्षण
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर लॉटरीपूर्वी प्रभाग निश्चित करण्यात येतील. फेरफार (चक्रानुक्रमे) - पुढील निवडणुकांत हे आरक्षण फिरत्या पद्धतीने लागू केले जाईल. जेणेकरून सर्व प्रभागांना एकदा तरी आरक्षण मिळेल आणि कोणताही प्रभाग सतत त्याच प्रवर्गासाठी आरक्षित राहणार नाही.
लॉटरी पद्धत - जर दोन किंवा अधिक प्रभागांमध्ये अनुसूचित जाती किंवा जमातींच्या लोकसंख्येची टक्केवारी समान असेल, तर त्या प्रभागांमधून चिठ्ठ्या टाकून अंतिम आरक्षण ठरवले जाईल.
अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणानंतर उरलेल्या प्रभागांमधून मागासवर्गीय नागरिकांसाठी आरक्षण दिले जाईल.
हे प्रभागही पुढील निवडणुकांमध्ये फिरत्या पद्धतीने बदलत राहतील, जेणेकरून सर्व प्रभागांना न्याय मिळेल.
अनुसूचित जातीतील महिलांसाठीच्या जागा आधीच एससीसाठी राखीव असलेल्या प्रभागांमधून ठरवण्यात येतील.
अनुसूचित जमातीतील महिलांसाठीच्या जागा एसटी राखीव प्रभागांमधून ठरतील.
सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठीच्या जागा उर्वरित सर्वसाधारण प्रभागांमधून चिठ्ठ्या टाकून ठरवल्या जातील. महिलांसाठीचे आरक्षणही फेरफार पद्धतीने बदलत राहील, जेणेकरून एकच प्रभाग सतत त्याच प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित राहणार नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीत
एकूण 227 प्रभाग असून यातील
17 प्रभाग अनसूचीत जातीव अनुसूचीत जमातीसाठी राखीव असतील.
उर्वरित 210 प्रभागांमधून
ओबीसी, महिला ओबीसी,
खुल्या प्रवर्गातील 50 टक्के महिला आरक्षण काढण्यात येईल.
राजकीय गणित बदलणार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण वगळता अन्य प्रभागातील आरक्षण नव्याने होणार असल्यामुळे राजकीय गणित बदलणार आहेत. नेमका कोणता प्रभाग आरक्षणात जाणार व खुल्या प्रवर्गात राहणार हे आरक्षणानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आरक्षणापर्यंत निवडणूक लढू इच्छिणारे गॅसवर राहतील.
भालचंद्र शिरसाट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, भाजपा