मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी आल्यानंतर त्याला मोर्चासारख्या माध्यमातून विरोध करणाऱ्या जैन समाजाने आता शांतिदूत जनकल्याण पार्टी या नव्या पक्षाची घोषणा करत आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी शनिवारी दादर येथे योगी सभागृहात झालेल्याधर्मसभेत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
जैन समाज हा देशातील सर्वाधिक कर भरणारा समाज आहे. त्यामुळे आता आम्ही आमचे प्रतिनिधित्व स्वतः करू. आम्ही आमचे वाघ उभे करू, आमची कबुतर पार्टी मैदानात उतरवू, अशा शब्दांत निलेशचंद्र विजय यांनी विद्यमान राजकीय पक्षांना अप्रत्यक्ष आव्हान दिले. त्यांच्या पक्षाचे चिन्ह ‘कबुतर’ असेल, अशीही घोषणा त्यांनी केली. दरम्यान जैन धर्मीय आणि व्यापारी समाजाच्या प्रभावाखाली असलेल्या या नव्या पक्षाचा प्रवेश ही राजकीय गणितात नवी भर ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयानंतर मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्मशांतीसाठी मुंबई जैनधर्मीय मुनींनी शनिवारी दादर येथे धर्मसभा आयोजित केली होती. या सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी शांतिदूत जनकल्याण पार्टी या नव्या पक्षाचे नाव जाहीर केले, तसेच आम्ही मुंबई महापालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ही केवळ जैनांची पार्टी नसेल. गुजराती, मारवाडी, तसेच इतर सर्व समाजघटकांना प्रवेश असेल. फक्त ‘चादर आणि फादर’ सोडून सगळ्यांना पक्षात सहभागी होता येईल, असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाला व्यापारीवर्ग, उद्योजक, तसेच मध्यमवर्गीय समाजाचा व्यापक आधार मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी वाघाच्या नावाने पक्ष स्थापन केला होता, आम्ही आमचे वाघ उभे करू, असे म्हणत निलेशचंद्र विजय यांनी शिवसेनेचा उल्लेख करून आपल्या पक्षाची तुलना ‘साहसी आणि लढाऊ’ प्रतिमेशी जोडण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतील बंद केलेले कबुतरखाने दिवाळीपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घ्या अन्यथा उपोषण आंदोलन सुरू करण्याचा इशारा जैन समुदायांनी दिला आहे. आता ही लढाई फक्त कबुतरांची नाही,तर गो मातेसाठी देखील असेल. सरकारला माझा नाही, तर सनातन धर्माचा इशारा असल्याचे जैन मुनींनी स्पष्ट केले.
जैन धर्मीय आणि व्यापारी समाजाच्या प्रभावाखाली असलेल्या या नव्या पक्षाचा प्रवेश ही राजकीय गणितात नवी भर ठरणार आहे. विशेषतः दक्षिण मुंबई, मालाड, बोरिवली, घाटकोपर आणि मुलुंड या व्यापारीवर्गाच्या वस्ती असलेल्या भागांमध्ये या पक्षाचा काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः भाजप, मनसे आणि शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघात या पक्षामुळे मतविभाजन होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
आगामी मुंबई महापालिकेत शांतिदूत जनकल्याण पार्टीतर्फे जैन मुनींनी प्रत्येक वॉर्डात जर उमेदवार उभे केले, तर यांचा सर्वाधिक राजकीय फटका हा भारतीय जनता पार्टीला बसू शकतो. भाजपाचा गुजराती, मारवाडी, जैन हा पारंपरिक वोट बँक आहे. मात्र जैन मुनींनी जर त्यांचे उमेदवार रिंगणात उभे केले, तर भाजपाचे मतदान कमी होईल, त्याचा परिणाम त्यांच्या उमेदवारांवर होऊ शकेल, असा राजकीय अंदाज बांधला जात आहे. यामुळे आता भाजपाकडून याविषयी काय भूमिका स्पष्ट होते, हे लवकरच कळेल.