

Maharashtra local body election 2025
मुंबई : राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारेंनी आज (दि. ४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्यातील नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यात राजकीय हालचालींना वेग येणार असून वातावरण तापू लागणार आहे.
राज्यभरातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घडामोड झाली असून न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन नगर परिषद व नगर पंचायत समित्यांच्या निवडणुकांविषयी महत्त्वाची माहिती दिली.
१० नोव्हेंबर नाम निर्देशन पत्र दाखल
अंतिम मुदत १७ नोव्हेंबर
छाननी १८ नोव्हेंबर
माघारी २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर (अपील)
२६ ला अंतिम यादी जाहीर
मतदान - २ डिसेंबर २०२५
निकाल - ३ डिसेंबर २०२५
राज्यात एकूण २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायत समित्या यांच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय राज्यात एकूण १४७ नगर पंचायतींपैकी ४२ नगर पंचायतांच्या निवडणुका या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. नगर परिषद सदस्यांची संख्या प्रत्येक ठिकाणी २० ते ७५ या दरम्यान आहे. प्रत्येक प्रभागातील एक सदस्यासाठी मतदारांना एकच मतदान करावे लागणार आहे.
या निवडणुकांमध्ये उमेदवारांसाठी आधुनिक सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना आता ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. संबंधित संकेतस्थळावर नामनिर्देशनाची माहिती भरून, ती आयोगाकडे सादर करता येणार आहे. तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
राज्यातील या निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३७६ मतदार आहेत. मतदानासाठी १३ हजार ३५५ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या सर्व नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन (EVM) द्वारे घेण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक त्या सर्व तयारीस सुरुवात केली आहे.