मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याचे कळते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्य न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत पहिल्या टप्प्यात नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या तर तिसऱ्या टप्प्यात मुंबईसह महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. यात नगरपालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
नगरपालिकेची निवडणुकीची प्रक्रिया डिसेंबरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे राज्य सरकारला घोषणा करता येणार नाहीत. केवळ विधेयके मंजूर करता येतील, असा एक विचार निवडणूक आयोग करत आहे. अन्यथा एक आठवड्याचे अधिवेशन असेल. ते संपताच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू शकेल. डिसेंबरअखेरला जिल्हा परिषदेची निवडणुकीची प्रक्रिया संपविण्याचा विचार आहे. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजतील.