

मुंबई : राज्यातील मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी असून राज्य सरकाने मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तिजोरील या निर्णयामुळे १४ हजार कोटीच्या महसूलाची वाढ होणार आहे. पण त्याचवेळी मद्यप्रेमींच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.
आज झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या प्रमूख निर्णयामध्ये शासनाचा महसूल वाढवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील शुल्क वाढविले आहे. यामध्ये भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर ( IMFL) दीड टक्याने वाढ करण्यात आली आहे.
आता यापुढे १८० मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमतीत प्रत्येक ब्रँडनुसार वेगळी होणार आहे. यामध्ये देशी मद्य- 80 रुपये होणार आहे तर महाराष्ट्रात तयार होणारे लिकर - १४८ रुपये, तसेच भारतीय बनावटीचे विदेशी मद्य - २०५ रुपये, विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड- ३६० रुपये अशी किमान विक्री किंमत राहणार आहे. यामध्ये प्रत्येक ब्रँडनुसार किंमतीमध्ये फरक पडणार आहे.
मद्याच्या किंमतीबरोबर उत्पादन वाढवण्यासाठी सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात १२२३ पद नव्याने भरण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासह राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मद्यप्रेमींनी मद्य विकत घेताना अधिकचे पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.